कोल्हापुरातील मोरेवाडीत हातभट्टी दारूचे सात अड्डे उदध्वस्त, दहा लाखांचा मुद्देमाल नष्ट
By उद्धव गोडसे | Updated: January 30, 2025 13:53 IST2025-01-30T13:53:20+5:302025-01-30T13:53:34+5:30
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील मोती नगर परिसरात दारूच्या हातभट्ट्यांवर केलेल्या कारवाईनंतर राजारामपुरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने सलग ...

कोल्हापुरातील मोरेवाडीत हातभट्टी दारूचे सात अड्डे उदध्वस्त, दहा लाखांचा मुद्देमाल नष्ट
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील मोती नगर परिसरात दारूच्या हातभट्ट्यांवर केलेल्या कारवाईनंतर राजारामपुरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने सलग दुसऱ्या दिवशी मोरेवाडी येथील हातभट्टीचे सात अड्डे उदध्वस्त केले. गुरुवारी सकाळी केलेल्या कारवाईत सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. गेल्या दोन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
राजेंद्रनगर आणि मोरेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू होत्या. निवडणूक काळात काही प्रमाणात कारवाया झाल्या. त्यानंतर पुन्हा हातभट्ट्या सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सुरू होता. राजारामपुरी पोलिसांनी बुधवारी दुपारी मोतीनगर येथील तीन अड्डे उदध्वस्त केले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मोरेवाडी येथे कारवाई करण्यात आली.
जेसीबीच्या मदतीने सात अड्डे उदध्वस्त केले. यात दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार दारू आणि इतर साहित्यासह सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह २५ पोलिसांचे पथक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १५ कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. बेकायदेशीर अड्डे सुरू केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती निरीक्षक चव्हाण यांनी दिली.