'प्राडा'च्या परदेशी पाहुण्यांनी मिरवली कोल्हापुरी! शिष्टमंडळ कोल्हापुरात, रुबाब पाहून अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 22:34 IST2025-07-15T22:34:35+5:302025-07-15T22:34:55+5:30

कोल्हापुरात परदेशी अधिकारी येण्यामागचे खास कारण होते

Senior officials of world famous Prada Company came to Kolhapur to see Kolhapuri Chappals | 'प्राडा'च्या परदेशी पाहुण्यांनी मिरवली कोल्हापुरी! शिष्टमंडळ कोल्हापुरात, रुबाब पाहून अवाक्

'प्राडा'च्या परदेशी पाहुण्यांनी मिरवली कोल्हापुरी! शिष्टमंडळ कोल्हापुरात, रुबाब पाहून अवाक्

संदीप अडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: कोल्हापुरी हिसका बसल्यानंतर वार्षिक ५० हजार कोटींची उलाढाल असलेल्या प्राडा या जगप्रसिद्ध चप्पल कंपनीची तांत्रिक समिती मंगळवारी कोल्हापुरात आली. कारागिरांचे अस्सल गुणवत्तापूर्ण काम पाहून या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांनीही तोंडात बोटे घातली. कोणत्याही यंत्राचा वापर न करता, येथील कारागीरांनी केवळ हाताने विणलेल्या चामडी वेण्या, जनावरांचे सुबक कातडे, आकर्षक कलाकुसर, रेखीव बांधणी आणि नैसर्गिक थंडावा देणारी, हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही रुबाबदार कोल्हापुरी चप्पल या परदेशी पाहुण्यांनी पायात घालून मिरवली.

कोल्हापुरात का आले परदेशी अधिकारी?

परदेशातील अधिकारी कोल्हापुरात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुढच्या महिन्यात कंपनीचे वरिष्ठ वितरण अधिकारीही कोल्हापुरात येणार आहेत. इटलीच्या मिलान शहरातील २३ जूनच्या फॅशन शोमध्ये मॉडेल्सच्या पायात जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलेची हुबेहूब कॉपी झळकली, मात्र, कोल्हापूरचा नामोल्लेख त्यांनी टाळला. यामुळे या कंपनीवर कोल्हापुरी चप्पलेचा ब्रँड चोरल्याची सर्व स्तरातून टीका झाली. त्यानंतर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने या कंपनीशी पत्रव्यवहार करून त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यामुळे या कंपनीने चूक मान्य करत मंगळवारी कोल्हापुरात येऊन दुपारी जवाहरनगर येथील रोहित गवळी, शुभम सातपुते, सुनील लोकरे पारंपरिक कोल्हापुरी चप्पल निर्मिती कारखान्यासह लीडकॉमच्या कार्यालयाला भेट दिली. यानंतर कंदलगाव येथील दिलीप मोरे आणि कागल येथील महिलांच्या चप्पल क्लस्टरलाही भेट दिली. चप्पल निर्मितीची माहिती घेतली. याबाबत त्यांनी लेखी पत्रव्यवहार केला होता. 

प्राडाचे संकलन आणि विकास विभागाचे संचालक आंद्रे बॉक्सरो, पुरुषांच्या फुटवेअर विभागाचे तांत्रिक आणि उत्पादन विभागाचे संचालक पाओलो टिव्हरॉन, पॅटर्न मेकिंग व्यवस्थापक डॅनियल कोंटू, बाह्य सल्लागार आंद्रिया आणि रॉबट्रो पोलास्ट्रेली, गौतम मेहरा यांनी चप्पल कारागिरांशी संवाद साधला. ही तांत्रिक समिती आपला अहवाल कंपनीच्या मुख्य वितरकांकडे देणार आहे. यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी, माजी नगरसेवक भूपाल शेटे, शिवाजीराव पवार, मेघ गांधी यांच्यासह कारागीर उपस्थित होते.

Web Title: Senior officials of world famous Prada Company came to Kolhapur to see Kolhapuri Chappals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.