Kolhapur: कागल नव्या सीमा तपासणी नाक्याविरोधात आत्मदहनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:33 IST2024-12-10T12:32:48+5:302024-12-10T12:33:27+5:30
दुकानगाळे काढून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

Kolhapur: कागल नव्या सीमा तपासणी नाक्याविरोधात आत्मदहनाचा इशारा
कागल : येथील महामार्गावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेला खासगी तत्त्वावरील सीमा तपासणी नाका सुरू होण्यासाठी सज्ज झाला असताना, नाक्याशी संबंधित घटकांनी व्यवस्थापनाविरोधात आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. कागलमधील दोघा युवकांनी येथील दुकान गाळ्यांच्या विषयावरून थेट जिल्हा पोलिसप्रमुखांना निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सुयोग शिंदे (रा. श्रमिक वसाहत) व बबन रेवडे (रा. बिरदेव वसाहत, कागल) अशी त्यांची नावे आहेत.
या नाक्यावर दोन्ही बाजूला मिळून १८ दुकान गाळे आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या सेवासुविधा येथील वाहनचालकांना व देण्याच्या आहेत. या युवकांनी २०१८ मध्ये तत्कालीन व्यवस्थापनाबरोबर लेखी करार करून एका बाजूचे नऊ दुकानगाळे भाडेतत्त्वावर घेतले आहेत व शहरातील इतर लोकांना दिले आहेत. मात्र सध्याच्या व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष करून त्यांना येथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
दुसऱ्या बाजूच्या नऊ दुकानगाळ्यांचाही असाच विषय झाला आहे. येथे कंपनीने कुलपे तोडून गाळे ताब्यात घेतले आहेत. कागल शहरातील बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगार मिळणार असून, कंपनी जाणूनबुजून हे गाळे काढून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कागल शहरातील तरुण मंडळांना एकत्र करून याविरोधात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याबद्दल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.
कराराचे पालन नाही
जिल्ह्यातील मालवाहतूक ट्रक चालक-मालक संघटनेने या नाक्याला विरोध केला असून, सोमवारी आंदोलन होईल म्हणून दिवसभर येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण आंदोलन झाले नाही. सायंकाळी या नाक्यासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी बैठक घेण्यात आली. जमिनी संपादन करताना जो करार झाला होता त्याचे पालन केले गेले नाही, असा या शेतकऱ्यांचा आरोप आहे.