Kolhapur-बिद्री गर्भलिंग प्रकरण: गर्भपाताच्या गोळ्या पुरवणाऱ्या मेडिकलवाल्याचा शोध सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:09 IST2026-04-01T19:07:33+5:302026-04-01T19:09:26+5:30

साक्षीदारांची पडताळणी सुरू

Search underway for medical practitioner who supplied abortion pills in Bidri Pregnancy diagnosis case | Kolhapur-बिद्री गर्भलिंग प्रकरण: गर्भपाताच्या गोळ्या पुरवणाऱ्या मेडिकलवाल्याचा शोध सुरु 

संग्रहित छाया

कोल्हापूर : बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपातासाठी औषधे पुरविणाऱ्या मेडिकल चालकाचे नाव पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. लवकरच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. त्याच्या चौकशीतून औषधांचा पुरवठा करणाऱ्या काही वितरकांची नावे समोर येणार आहेत. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वत:चा वैद्यकीय सेवेचा परवाना निलंबित असताना दुसऱ्या डॉक्टरांच्या परवान्यावर सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या युवराज पाटील याच्या तपासाची व्याप्ती वाढली आहे. डॉक्टरसह हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि एजंट यांना अटक झाल्यानंतर त्यांना गर्भपाताकरिता गोळ्या पुरविणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. यात एका मेडिकल चालकाचे नाव निष्पन्न झाले असून, त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी हॉस्पिटलवर कारवाई करताच मेडिकल चालक पसार झाला आहे. लवकरच त्याला अटक होईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या अटकेनंतर प्रतिबंधित औषधांचे वितरण करणारे वितरकही पोलिसांच्या रडारवर असतील. जिल्ह्यात प्रथमच गर्भलिंग निदान गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून, त्यातून मोठे रॅकेट उघडकीस येत आहे.

आरोपींची संख्या वाढली

बिद्री येथील गर्भलिंग निदान प्रकरणी एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील डॉ. उत्तमकुमार सरदेसाई आणि हॉस्पिटलमधील कर्मचारी आक्काताई कांबळे या दोघांना अद्याप अटक झालेली नाही. उर्वरित ११ आरोपी अटकेत असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मेडिकल चालकाचे नाव निष्पन्न झाल्याने त्याच्या चौकशीतून आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

साक्षीदारांची पडताळणी सुरू

या गुन्ह्यात काही साक्षीदार पोलिसांना मिळाले आहेत. गर्भपातासाठी आलेल्या काही महिलांचा यात समावेश आहे. त्यांची पडताळणी करून जबाब नोंदविण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. न्यायालयात गुन्हा सिद्ध करता यावा, यासाठी ठोस पुरावे गोळा केले जात आहेत. आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.

Web Title : कोल्हापुर: गर्भपात गोली मामले में मेडिकल सप्लायर की तलाश

Web Summary : कोल्हापुर गर्भपात मामले में पुलिस को मेडिकल सप्लायर की तलाश है। जांच में दवा वितरण रैकेट का खुलासा, और गिरफ्तारियां होने की उम्मीद।

Web Title : Kolhapur: Medical Supplier Hunted in Abortion Pill Case

Web Summary : Police seek a medical supplier in the Kolhapur abortion case. Investigation widens, revealing a potential drug distribution racket. More arrests are expected.