Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:26 IST2025-06-13T18:25:19+5:302025-06-13T18:26:50+5:30
हृदयद्रावक घटनेने हळहळ

Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
उचगाव : सरनोबतवाडी येथे गुरुवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. दरम्यान, उजळाईवाडी-सरनोबतवाडीतील संगम-अमृत नगर कॉलनी (धोंडेनगर) येथील अमन जमालुद्दीन भालदार (वय ११) हा सहावीत शिकणारा मुलगा सरनोबतवाडी येथे खासगी क्लाससाठी सायकलवरून जात असताना पावसाने रस्त्यावर आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहाबरोबर वाहून गेला. अद्याप त्याचा शोध लागला नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अमन हा राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हापूर येथे सहावीत शिक्षण घेत होता. सायंकाळी साडेपाच वाजता खासगी क्लाससाठी सायकलवरून तो सरनोबतवाडी येथे जात होता. यावेळी ओढ्याच्या पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तो सायकलसह पाण्यात उतरला, मात्र त्याचा तोल जाऊन तो प्रवाहाबरोबर वाहून गेला.
या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, अन्य अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. ओढ्याच्या काठी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. अमनची आई मुमताज यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
ओढ्याच्या शेजारी असलेल्या वीटभट्टीवरील कामगारांनी अमनला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याच्या जॅकेटमध्ये पाणी भरल्यामुळे जॅकेट त्याच्या तोंडाला गुंडाळले गेले. त्यामुळे त्याचा तोल गेला व ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. आज, शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. अद्याप त्याचा शोध लागला नाही.