Kolhapur: वडील शाळेत आणायला गेले, मुलाने मित्रांसोबत खेळून १५ मिनिटांत घरी येतो असे सांगितले; पण विपरीतच घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:41 IST2025-04-17T12:40:58+5:302025-04-17T12:41:15+5:30

परीक्षा संपताच पोहण्यासाठी गेल्यावर घटना

Schoolboy drowns in mine after going swimming in Kolhapur | Kolhapur: वडील शाळेत आणायला गेले, मुलाने मित्रांसोबत खेळून १५ मिनिटांत घरी येतो असे सांगितले; पण विपरीतच घडले

Kolhapur: वडील शाळेत आणायला गेले, मुलाने मित्रांसोबत खेळून १५ मिनिटांत घरी येतो असे सांगितले; पण विपरीतच घडले

कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत परिसरातील एका शाळेत आठवीत शिकणारा शिव नवीन पटेल (वय १४, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) याचा वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर बुधवारी संपला. नेहमीप्रमाणे वडील त्याला आणायला शाळेत गेले होते. पण, मित्रांसोबत खेळून १५ मिनिटांत घरी येतो असे सांगून पत्तौडी खणीत पोहण्यासाठी गेलेला शिव घरी परतलाच नाही. मुलाचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याने पटेल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ही दुर्घटना बुधवारी (दि. १६) दुपारी घडली.

टिंबर मार्केट येथील नवीन पटेल यांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. पत्नी, मुलगी विधी आणि लहान मुलगा शिव यांच्यासह ते टिंबर मार्केट येथील पाटीदार भवनजवळ राहतात. शिव हा साने गुरुजी वसाहत येथील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता. बुधवारी वार्षिक परीक्षेचा अखेरचा पेपर होता. पेपर संपताच त्याच्यासह मित्रांनी पत्तौडी खणीत पोहायला जायचे ठरवले होते.

नेहमीप्रमाणे वडील त्याला घरी आणायला शाळेत गेले होते. पण, मित्रांसोबत खेळून १५ मिनिटांत घरी येतो, असे सांगून त्याने वडिलांना घरी पाठवले. त्यानंतर काही वेळ शाळेच्या आवारात खेळून सात ते आठ मुले पत्तौडी खणीकडे गेले. त्यावेळी पोहताना शिव खणीत बुडाला. मित्रांनी सायकलवरून जाऊन याची माहिती त्याच्या वडिलांना दिली.

दोन तासांनी सापडला मृतदेह

खणीवरील काही लोकांनी ११२ क्रमांकावर फोन करून मदत मागवली. जुना राजवाडा पोलिसांसह अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तास शोधमोहीम राबवून मृतदेह खणीतून बाहेर काढला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अग्निशामक दलाच्या जवानांसह जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील अंमलदार सागर मोरे, उदय काटकर, ऋषिकेश ठाणेकर, वैभव अतिग्रे यांनी शोधमोहिमेत सहभाग घेतला.

कुटुंबीयांना धक्का

चुणचुणीत आणि उत्साही स्वभावाचा शिव अभ्यासात हुशार होता. मित्र आणि नातेवाईकांमध्ये लाडका असलेल्या शिवचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सर्वांना धक्का बसला. त्याच्या आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सीपीआरमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती.

Web Title: Schoolboy drowns in mine after going swimming in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.