पालकमंत्री म्हणून सतेज गेले, केसरकर आले; प्रस्ताव पडूनच राहिले
By समीर देशपांडे | Updated: March 13, 2023 13:56 IST2023-03-13T13:20:13+5:302023-03-13T13:56:13+5:30
सतेज पाटील हे अडीच वर्षे पालकमंत्री असताना त्यांनीही समिती स्थापन केली नाही

पालकमंत्री म्हणून सतेज गेले, केसरकर आले; प्रस्ताव पडूनच राहिले
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना मानधन देण्याआधी त्यांची निवड करण्यासाठी एक समिती असते. परंतु सतेज पाटील हे अडीच वर्षे पालकमंत्री असताना त्यांनीही समिती स्थापन केली नाही आणि दीपक केसरकर पालकमंत्री होऊन साडे पाच महिने झाले तरी त्यांनी याकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतील एक हजाराहून अधिक वृद्ध कलावंतांचे अर्ज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये पडून आहेत.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने ही वृद्ध कलावंतांना मानधन देण्याची योजना राबवली जाते. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावरील कलावंतांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांना वर्षाला कमीतकमी २७ हजार आणि अधिकाधिक ३७ हजार ८०० रुपये मानधन देण्यात येते. यासाठी कलावंतांची निवड करण्यासाठी एक समिती पालकमंत्र्यांनी स्थापन करावयाची असते.
यामध्ये पालकमंत्र्यांनी ज्येष्ठ कलाकार किंवा साहित्यिक अध्यक्ष म्हणून नेमावा अशी अपेक्षा असते. सदस्य म्हणून पालकमंत्र्यांनी आणखी एक ज्येष्ठ साहित्यिक, पाच ते सहा ज्येष्ठ कलावंत, जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला वर्ग-१ चा एक अधिकारी हे या समितीचे सदस्य असतात. तर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतात.
उद्धव ठाकरे यांचे सरकार २०१९ मध्ये सत्तेवर आले. त्यानंतर सतेज पाटील हे कोल्हापूरचे पालकमंत्री झाले. परंतु नंतरच्या अडीच वर्षांच्या काळात ही समिती स्थापनच करण्यात आली नाही. २०१९-२०, २०२०-२१ या दोन वर्षांतील बाराही तालुक्यांचे अर्ज पडूनच आहेत. त्यांची निवडच होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक कलावंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे फेऱ्या मारून वैतागले आहेत.
राज्यात सत्तांतर होऊन आता नऊ महिने झाले. साडे पाच महिन्यांपूर्वी दीपक केसरकर हे पालकमंत्री झाले आहेत. परंतु, याबाबत फारशा हालचाली नाहीत. मुळात हे फारसे लाभाचे पद नसल्याने या समितीकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत राहिलेले आहे. परंतु शासनाची जर वृद्ध कलावंतांना मानधन देण्याची योजना आहे तर किमान मंत्र्यांनी लवकर समित्या स्थापन करून त्यांच्या वृद्धपणी तरी त्यांना दिलासा मिळेल हे पाहिले पाहिजे.
ह्यांची नावे यायचीत, त्यांची यायचीत
सतेज पाटील पालकमंत्री असताना त्यांनी कॉंग्रेसची नावे तयार ठेवली होती. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेची नावेच लवकर आली नसल्याने ही समिती स्थापन होऊ शकली नाही असे सांगण्यात येते. याच विलंबाने समितीची स्थापना झाली नाही आणि तोपर्यंत सरकारच बदलले.
वृद्ध कलावंतांचे पडून असलेले तालुकावर अर्ज
राधानगरी - ३१९
कागल - १८०
करवीर - १४४
हातकणंगले - ८६
शिरोळ - ६३
शाहूवाडी - ५७
पन्हाळा - ५६
भुदरगड - ४५
आजरा - ४०
गडहिंग्लज - ३७
चंदगड - ३६
गगनबावडा - ११