आरोप-प्रत्यारोपानंतर सतेज पाटील-चंद्रकांत पाटील आमने-सामने; अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 15:59 IST2022-04-06T15:58:36+5:302022-04-06T15:59:28+5:30
अगदी वैयक्तीक पातळीवर टीका टीप्पणी सुरु असल्याने नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. या अशा स्थितीत आज, बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शहरातील भेंडे गल्लीत काही क्षणांसाठी आमने-सामने आले.

आरोप-प्रत्यारोपानंतर सतेज पाटील-चंद्रकांत पाटील आमने-सामने; अन्..
कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांच्या आरोप - प्रत्यारोप आणि जोरदार इर्ष्येने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अगदी वैयक्तीक पातळीवर टीका टीप्पणी सुरु असल्याने नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. या अशा स्थितीत आज, बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शहरातील भेंडे गल्लीत काही क्षणांसाठी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांना नमस्कार केला अन् त्यांच्यात हास्य फुलले.
भेंडे गल्लीतील करवीर संस्थान मठात स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या दर्शनासाठी राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवर सकाळी आले होते. महास्वामींचे दर्शन घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कार्यकर्त्यांसह भेंडे गल्लीतून बाहेर पडत असताना पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, माजी नगरसेवक राजू लाटकर त्याठिकाणी आले.
लाटकर यांनी चंद्रकांत पाटील यांना ‘दादा, जय जिनेंद्र’ असे म्हणत नमस्कार केला. पाटील यांनीही त्यांना नमस्कार केला. त्यावेळी लाटकर यांच्या मागे असलेल्या पालकमंत्री पाटील यांनी ‘दादा, नमस्कार आम्ही इकडे आहोत’, असे म्हणत प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी देखील पालकमंत्री पाटील यांना नमस्कार करत ‘आम्हीही इकडे आहोत’, असे म्हणताच या दोघांसह उपस्थितांमध्ये हास्य फुलले. काही क्षणांच्या भेटीनंतर हे दोन्ही नेते तेथून रवाना झाले.