कोडोलीच्या सहकार चळवळीतील ‘सर्वोदय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:26 AM2019-02-11T00:26:22+5:302019-02-11T00:26:27+5:30

रवींद्र पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोडोली : कोल्हापूर जिल्ह्यात संस्थानकाळापासूनच सहकार चळवळ रुजली, वाढली आणि तिचा वटवृक्ष झाला. ...

'Sarvodaya' in Kodoli's co-operation movement | कोडोलीच्या सहकार चळवळीतील ‘सर्वोदय’

कोडोलीच्या सहकार चळवळीतील ‘सर्वोदय’

googlenewsNext

रवींद्र पोवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोडोली : कोल्हापूर जिल्ह्यात संस्थानकाळापासूनच सहकार चळवळ रुजली, वाढली आणि तिचा वटवृक्ष झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने अनेक संस्था नावारूपाला आल्या. यामुळेच राज्यासह देशातीलही सहकार चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजर्षींनी या चळवळीच्या प्रगतीला दिशा देण्यासह या क्षेत्रात काम करण्यास पुढे येणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य केले. यातूनच ३० मे १९१८ रोजी पन्हाळा महालातील (तालुका) कोडोली गावात कोडोली टाऊन को-आॅप. पतपेढी, अर्थात सध्याच्या सर्वोदय सेवा संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. शतकमहोत्सवी परंपरा असलेल्या या संस्थेने यशाची अनेक शिखरे पादांक्रात करत सहकार चळवळ टिकविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या संस्थेचे प्रारंभी ५० सभासद होते. तर खेळते भांडवल ४,२५० रुपये इतके होते. संस्थेने १९४४ पासून कर्जपुरवठा व्यतिरिक्त औषध दुकान, धान्य दुकान, खाद्यतेल, कापड दुकान विभाग सुरू केला. प्रारंभी संस्थेचे कामकाज भाड्याच्या इमारतीत सुरू होते. कालांतराने शिवाजी चौक येथे स्वमालकीच्या इमारतीत कामकाज सुरू झाले. त्याकाळी सोसायटीकडून सभासद शेतक ºयांना शेतीसाठी रोख कर्ज, खते, बियाणे, इंजिनसाठी तेल पुरविले जात असे. त्याकाळी सोसायटीच्या पदाधिकारीपदाची जबाबदारी मुद्दामहून कोणाकडे तरी सोपविण्यात येई. त्यामागे स्पर्धा नव्हे तर गावासाठी कुणीतरी हे काम केले पाहिजे ही भावना असे. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर अन्नधान्याची चणचण होती. महागाई वाढली होती. यावेळी सहकारात उत्तम कार्य करीत असलेली संस्था असा नावलौकिक असल्याने ब्रिटिश सरकारने या सोसायटीकडे रेशनिंगचे काम सोपविले. संस्थेकडून सभोवतालच्या दहा खेड्यांतील ८ ते १० हजार लोकांना रेशन पुरवठा होत होता. संस्था नावाने केवळ पतपेढी असली तरी शेतकºयांना नांगर भाड्याने दिले जात होते. १२ जानेवारी १९५५ ला या संस्थेचे नाव ‘सर्वोदय विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. कोडोली’ असे केले. या संस्थेत केलेल्या कार्याच्या अनुभवातूनच नंतर सहकारमहर्षी कै. तात्यासाहेब कोरे, स्वर्गीय द. रा. पाटील, माजी आमदार स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील यांनी सहकार चळवळीला बळ दिले.
१९५८-५९ मध्ये ५० हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर खरेदी करून सभासदांना भाड्याने देण्यात येऊ लागला. दि. १४-१०-१९५९ ला सरकारने जिन्नस गहाण विभाग सुरू करण्यास परवानगी दिली, ती आजतागायत सुरू आहे. १९६७ मध्ये जागा खरेदी करून सिमेंट काँक्रिटची इमारत बांधली. १९८० मध्ये दळप कांडप विभाग, १९८१ मध्ये जीवनोपयोगी विविध वस्तू भांडारही सुरू केले. १९८२ मध्ये गोडावून बांधले. १९९१ मध्ये सर्वोदय पाणीपुरवठा योजना सुरू केली. १९९८-२००० मध्ये सर्वोदय बझार व शॉपिंग सेंटर सुरू केले, तर २००२ मध्ये सांस्कृतिक हॉल बांधला.
सोसायटीस भेट दिलेले मान्यवर
खासदार स्वर्गीय उदयसिंगराव गायकवाड, सहकारमंत्री यशवंतराव मोहिते, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, शालिनीताई पाटील, डॉ. बळिराम हिरे, खासदार बाळासाहेब माने, अरुण नरके, बाबूराव धारवाडे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी आमदार गुलाबराव पाटील, माजी मंत्री भाई सावंत.
सोसायटीची पहिली पंच कमिटी
दत्तो नारायण कुलकर्णी (चेअरमन), तात्या सुभाना पाटील (खजिनदार), आण्णा केशव पाटील (सदस्य), श्रीपती गोविंद पाटील (सदस्य), रामचंद्र केशव कुलकर्णी (सचिव)

Web Title: 'Sarvodaya' in Kodoli's co-operation movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.