महाराष्ट्र रणजी संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोल्हापूरचे संग्राम अतितकर, अन्य समितीवर सातजणांची निवड
By सचिन भोसले | Updated: March 3, 2023 19:10 IST2023-03-03T19:09:53+5:302023-03-03T19:10:47+5:30
या निवडीमुळे कोल्हापुरात उत्साहाचे वातावरण

महाराष्ट्र रणजी संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोल्हापूरचे संग्राम अतितकर, अन्य समितीवर सातजणांची निवड
कोल्हापूर : महाराष्ट्र किक्रेट असोसिएशनच्या विविध उप समितीवर संग्राम अतितकर, अमृता शिंदे, अतुल गायकवाड, शैलेश भोसले, केदार गयावळ, अभिजीत भोसले, चंदाराणी कांबळे यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्यातर्फे सन २०२२-२३ या हंगामासाठी विविध उप समितीची घोषणा करण्यात आली. यामध्ये माजी रणजी खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन वरिष्ठ निवड समितीचे सदस्य संग्राम अतितकर यांची महाराष्ट्र रणजी संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी, तर माजी भारतीय कसोटी व एकदिवशीय महिला क्रिकेटपटू अमॄता शिंदे यांची महाराष्ट्र १५ वर्षाखालील महिला संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.
माजी रणजी खेळाडू अतुल गायकवाड यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ व्यवस्थापकपदी, माजी रणजी खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन ज्युनियर निवड समितीचे सदस्य शैलेश भोसले यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघ निवड समितीच्या सदस्यपद निवड झाली. केडीसीए चे सचिव केदार गयावळ यांची महाराष्ट्र स्पर्धा कमिटी सदस्यपदी, तर १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे खेळाडू व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजानिस अभिजीत भोसले यांची वर्णी लागली.
यासह माजी महाराष्ट्र महिला संघाची माजी कर्णधार व आंतररााष्ट्रीय महिल क्रिकेटपटू चंदाराणी कांबळे यांची महाराष्ट्र १९ वर्षाखालील व खुला गट महिला संघाच्या संघव्यवस्थापकपदी निवड झाली. या निवडीमुळे कोल्हापूरच्या क्रिकेट क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात निवडी झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.