Kolhapur Politics: संभाजीराजेंचे 'स्वराज्य'च लोकसभेच्या मार्गात अडसर 

By विश्वास पाटील | Published: January 20, 2024 04:00 PM2024-01-20T16:00:18+5:302024-01-20T16:03:17+5:30

राज्यसभेलाही हाच ठरला होता अडथळा

Sambhaji Raje Swarajya Party is a stumbling block in the Lok Sabha | Kolhapur Politics: संभाजीराजेंचे 'स्वराज्य'च लोकसभेच्या मार्गात अडसर 

Kolhapur Politics: संभाजीराजेंचे 'स्वराज्य'च लोकसभेच्या मार्गात अडसर 

कोल्हापूर : स्वराज्य संघटनेचा बंध तोडून टाकला तरच माजी खासदार संभाजीराजे यांचा कोल्हापूर मतदार संघातून महाविकास आघाडीकडून विचार होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी दोन पावले मागे येण्याची गरज आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या पाठिंब्यावर स्वराज्य संघटनेकडून ते लढतो म्हटले तर त्यास या पक्षांकडून संमती मिळण्याची शक्यता नाही. राज्यसभेच्या निवडणुकीतही त्यांना याच मुद्द्यावर माघार घ्यायला लागली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याच्यादृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरणारा आहे.

इचलकरंजीत गुरुवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या बाबतीतही असाच मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यांनाच जर दोन्ही आघाड्या नको आहेत तर आपण त्यांच्यामागे फरफटत जाऊ नये. आघाडीतील घटक पक्षांतील कुणालाही उमेदवारी द्यावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. संभाजीराजे यांच्याबाबतीतही तोच मुद्दा उपस्थित होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना खुली ऑफर दिली होती. परंतु संभाजीराजे हे अपक्ष लढणार या भूमिकेवर ठाम राहिले. अपक्ष लढून सर्वांनी पाठिंबा द्यावा असा त्यांचा त्यावेळी प्रयत्न होता. त्याला यश आले नाही. त्यातून शिवसेनेत व त्यांच्यात कटूता निर्माण झाली. आताही त्यांना दोन बाबींचा तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे. 

एक म्हणजे कोल्हापूर की नाशिक हे अगोदर निश्चित करावे लागेल. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ते स्वराज्यसाठी जागा सोडा असा आग्रह धरत आहेत. परंतु त्यांना जागा सोडण्याऐवजी स्वराज्यची महाराष्ट्राच्याच नव्हे तर कोल्हापूरच्या राजकारणातही स्पेस नाही. शेट्टी यांनी एकला चलो रे ची भूमिका घेण्यामागे त्यांचे स्वत:चे काही गणित आहे. यापूर्वी तीच भूमिका घेऊन ते दोनवेळा खासदार झाले आहेत. 

हातकणंगलेत स्थानिक कार्यकर्ते कितीही आक्रमक झाले तरी महाविकास आघाडीपुढे शेट्टी यांच्याशिवाय अन्य पर्यायही नाही. शिवाय तिन्ही घटक पक्षांचे केंद्रीय नेतृत्व त्यांना जागा सोडण्याची घोषणा करत असल्याने शेट्टी यांचा भाव वधारला आहे. तशी स्थिती संभाजीराजे यांच्या बाबतीत नाही. त्यांच्या उमेदवारीला नक्कीच बळ मिळू शकते परंतु त्यासाठी त्यांना एकतर शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये थेट प्रवेश करावा लागेल. दुसऱ्याला पोरगं झाले म्हणून आम्ही किती दिवस पेढे वाटायचे अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. म्हणून ही जागा कोणत्या पक्षाकडे जाऊ शकते याचा अंदाज घेऊन त्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. 

कोल्हापूर शहर मतदार संघातून २००४ ला राष्ट्रवादीत सक्रिय असलेल्या मालोजीराजे यांना रात्रीत काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना मैदानात उतरवले व ते विजयी झाले हा इतिहास आहे. ही निवडणूकही त्याच दिशेने जाताना दिसत आहे. देशभरातील राजेराजवाडे सत्तेसाठी भाजपकडे जात असताना कोल्हापूरचे छत्रपती घराणे जर महाविकास आघाडीसोबत जात असेल तर त्यातून देशभर वेगळाच मेसेज जाणार आहे. त्याअर्थानेही संभाजीराजे यांची उमेदवारी महत्त्वाची ठरणारी आहे.

अन्य संभाव्य इच्छुक असे

कोल्हापूर मतदार संघ :
महाविकास आघाडी : संजय घाटगे, व्ही. बी. पाटील, चेतन नरके, बाजीराव खाडे

हातकणंगले मतदार संघ
महायुती : राहुल आवाडे, संजय पाटील
महाविकास आघाडी : प्रतीक जयंत पाटील

Web Title: Sambhaji Raje Swarajya Party is a stumbling block in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.