टाटांची प्रेरणा, पाऊण कोटीचा भूखंड देऊन जपली दातृत्वाची भावना; कोल्हापुरातील सागर पाटील यांचे मोठेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:33 IST2024-12-31T16:30:55+5:302024-12-31T16:33:20+5:30

वडिलांच्या स्मरणार्थ पाच गुंठे क्षेत्र एकटी संस्थेला दान

Sagar Patil of Kolhapur donated a land worth five crores to a Ekati Foundation in memory of his father | टाटांची प्रेरणा, पाऊण कोटीचा भूखंड देऊन जपली दातृत्वाची भावना; कोल्हापुरातील सागर पाटील यांचे मोठेपण

टाटांची प्रेरणा, पाऊण कोटीचा भूखंड देऊन जपली दातृत्वाची भावना; कोल्हापुरातील सागर पाटील यांचे मोठेपण

कोल्हापूर : भारतरत्न रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांनी समाजासाठी काय-काय केले, हे वाचून त्यांच्याही मनात आपणही काही समाजाचे ऋण फेडावे, अशी भावना निर्माण झाली आणि त्यांनी निर्णय घेतला. वडणगे-निगवे (ता. करवीर) रस्त्यावरील सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा ५ गुंठे भूखंड एकटी संस्थेला दान केला. त्या जागेवर असलेल्या खोल्यांचा किल्ल्याच त्यांनी सोमवारी अवनी संस्थेकडे सुपूर्द केल्या. समाजाच्या भल्याचा विचार करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे सागर रंगराव पाटील. नववर्षात आपण हे करू, ते करू असा अनेकजण पण करतात, परंतु त्यांनी जे मनात आले ते करून कोल्हापूरच्या मातीची दातृत्वाची भावना जोपासली.

सागर पाटील हे शाहुपुरीत राहतात. त्यांची वडिलोपार्जित शेती आहे. हा भूखंडही त्यांच्या वडिलांनीच घेतला होता. आपण शहरात राहतो. या भूखंडाचा आता तसा आपल्याला फारसा काही उपयोग नाही, तो चांगल्या कामासाठी द्यावा, असा विचार त्यांनी केला. सख्ख्या भावासाठीही गुंठाभर जमीन सोडताना वाद घालणारा समाज सगळीकडे असताना, त्यांनी मात्र क्षणाचाही विलंब न लावता भूखंड देण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी स्वत:हून अवनी संस्थेशी जेव्हा संपर्क साधला, तेव्हा संस्थेलाही क्षणभर त्यावर विश्वासच बसला नाही. आम्हाला आई-वडिलांनी सगळे भरभरून दिले, म्हणून त्यातीलच मूठभर आम्ही समाजासाठी देत असल्याची त्यांची भावना आहे. समाजात अशी माणसे आहेत, म्हणूनच हा गाडा पुढे चालतो आहे. ते म्हणतात, पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षाही आयुष्यात गोरगरिबांची सेवा करणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. मृत्यूनंतरही तुमचे कार्य चिरस्मरण राहण्यासाठी गोरगरीब, निराधार लोकांसाठी मदत केली पाहिजे.

एकटी संस्थेचे सामाजिक कार्य पाहून सागर पाटील यांनी हा भूखंड दिला. वडील रंगराव यांना ते अण्णा म्हणत. त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे दान केले. एकटी संस्था तिथे ‘अण्णामाई सेवासदन’ सुरू करणार आहे. जागेच्या उद्घाटन सोहळ्यास गीतादेवी रंगराव पाटील प्रमुख उपस्थित होत्या. वडणगेच्या सरपंच संगीता पाटील अध्यक्षस्थानी होत्या.

सरपंच पाटील म्हणाल्या, समाजातील माणुसकी हरवत चालली असता, सागर पाटील यांनी केलेले काम आदर्शवत आहे. एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले म्हणाल्या, या जागेत आम्ही बेघर वृद्धांसाठी मोफत निवारा करत आहोत. डॉ. अजित देवणे यांनी ‘अण्णामाई सेवासदन’मधील लोकांच्या औषध उपचाराचा खर्च मोफत करणार असल्याचे सांगितले.

या वेळी डॉ. अमरसिंह रजपूत, एकटी संस्थेचे सल्लागार जैनुद्दीन पन्हाळकर, तलाठी प्रकाश महाडेश्वर यांनी मनोगत व्यक्त केले. इकबाल रेठरेकर, अक्षय पाटील, पुष्पा कांबळे, पुष्पा पठारे, जगदीश कांबळे, सविता कांबळे, अभिजीत कांबळे, पवन कदम, शुभम कामत, अर्चना गाडी, कार्तिकी निगवेकर, निकीता राजपूत आदींनी संयोजन केले. सुरेखा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Sagar Patil of Kolhapur donated a land worth five crores to a Ekati Foundation in memory of his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.