Kolhapur: बालकल्याण संकुलातील ‘रुक्मिणी’ झळकणार राज्यभर; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रसिद्धी मोहिमेत चित्र काढण्याची मिळाली संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:43 IST2025-08-08T16:40:27+5:302025-08-08T16:43:25+5:30
मंत्री आदिती तटकरे यांनी केले कौतुक

Kolhapur: बालकल्याण संकुलातील ‘रुक्मिणी’ झळकणार राज्यभर; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रसिद्धी मोहिमेत चित्र काढण्याची मिळाली संधी
कोल्हापूर : कला ही कुणाची मक्तेदारी नसते तर ती आपसूक फुलत जाणारी गोष्ट आहे. या कलेमुळे ‘बालकल्याण संकुल’मध्ये राहत असलेल्या रुक्मिणी मंजुनाथ राठोड या १८ वर्षांच्या मुलीला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या राज्यभर राबवल्या जाणाऱ्या प्रसिद्धी मोहिमेत चित्र काढण्याची संधी मिळाली आहे. कलानिकेतनमध्ये चित्रकलेतील ॲडव्हान्सच्या वर्गात शिकत असलेल्या ‘रुक्मिणी’ची चित्रे पाहून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी तसे आदेश दिले.
दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलास भेट दिली. संस्थेतील प्रत्येक विभागाची माहिती घेतल्यानंतर त्या आर्ट अँड ॲक्टिव्हिटी विभागात आल्या इथे रुक्मिणीसह संस्थेतील मुलींनी केलेल्या फॅशन डिझायनिंग, क्लॉथ पेंटिंग, शोभेच्या वस्तू व अन्य कलाकृती त्या पाहत होत्या. त्याचवेळी त्यांनी रुक्मिणीने काढलेली सुंदर चित्रे पाहिली.
तिच्या कलेचे कौतुक करत तिथेच त्यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची प्रसिद्धी मोहिमेत तिला सहभाग करून घ्या, तिला संकल्पना सांगा व तिच्याकडून चित्र काढून घेऊन तेच मोहिमेमध्ये वापरा, असे आदेशच त्यांनी दिले. रुक्मिणीने मंत्री तटकरे यांचे उत्तम स्केच तयार केले होते. संस्थेने त्यांचा सत्कार करताना त्यांना एक भेट वस्तू दिली. त्यांनी ती तिथेच उघडून पाहिली आणि त्या थक्कच झाल्या. कारण, त्यांचे रुक्मिणीने पेन्सीलने काढलेले त्यांचे ते हुबेहूब चित्र होते. तिथेच मंत्री तटकरे यांनी तिला बाेलवून घेऊन तिचा सत्कार केला.
रुक्मिणीच्या आनंदाला पारावार राहिला नाही
मूळच्या कर्नाटकातील आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर मायेला पोरक्या झालेल्या रुक्मिणीसह तिच्या दोन बहिणी व भाऊ, अशी चार भावंडं २०१८ मध्ये बालकल्याण संकुलमध्ये दाखल झाली. संस्थेत राहूनच मोठी बहीण पदवीधर झाली. लहान बहीण बारावीत आणि भाऊ अकरावीला आहे. आपल्या कलेचे कौतुक झाले आणि मिळालेली संधी पाहून रुक्मिणीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अशा अनेक रुक्मिणी बालकल्याण संकुल घडवत आहे, हे या संस्थेचे राज्यातील वेगळेपण आहे आणि ते पाहून मी भारावून गेले, अशी प्रतिक्रिया मंत्री तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.