Kolhapur: आजरा तालुक्यातील धरणग्रस्तांसाठी खुशखबर, घरबांधणीसाठी ६ कोटी रुपये अनुदान मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 18:04 IST2025-02-13T18:04:06+5:302025-02-13T18:04:30+5:30
श्रमिक मुक्तिदलाच्या १२ वर्षांच्या संघर्षाला यश

संग्रहित छाया
राम मगदूम
गडहिंग्लज : आजरा तालुक्यातील सर्फनाला, आंबोओहोळ व उचंगी या तीन प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या ३८१ धरणग्रस्तांना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून घरबांधणीसाठी प्रत्येकी १ लाख ६१ हजारप्रमाणे सुमारे ६ कोटी १३ लाख ४१ हजार रुपये अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांतून समाधान व्यक्त होत आहे.
पुणे येथे श्रमिक मुक्तिदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ व हणमंत गुणाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे तब्बल १२ वर्षांच्या लढाईला यश मिळाले.
सुरुवातीला धरणग्रस्तांना घरबांधणीसाठी प्रत्येकी ८ हजार रुपये बिनव्याजी कर्ज दिले जात होते. त्यानंतर १० हजार रुपये अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय झाला. परंतु, ही तुटपुंजी रक्कम आजऱ्यातील धरणग्रस्तांनी स्वीकारली नव्हती. केंद्राच्या भूसंपादन व पुनर्वसन कायद्यानुसार १ लाख ६१ हजारांचे अनुदान मिळावे, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी वेळोवेळी मोर्चे, आंदोलनेही झाली.
भूखंड मिळालेल्यांनाच अनुदान!
''सर्फनाला'' धरणात घर बुडालेल्या १२५ प्रकल्पग्रस्तांना शेळप व देवर्डे, ''उचंगी''च्या ११५ धरणग्रस्तांना कोळींद्रे, चित्रानगर, आवंडी व रायवाडा येथे तर ''आंबेओहोळ''च्या १४१ पैकी ४९ धरणग्रस्तांना कडगाव व लिंगनूर येथे भूखंड देण्यात आले आहेत. उर्वरित १०५ भूखंडाचे वाटप अद्याप बाकी आहे. लाभक्षेत्रातील नव्या वसाहतीत भूखंड मिळालेल्या सर्वांना ही रक्कम मिळणार आहे.
२०१३ मध्ये केंद्र सरकारने भूसंपादन व पुनर्वसन कायद्यात धरणग्रस्तांच्या घरबांधणीसाठी १ लाख ६१ हजार रुपये देण्याची तरतूद केली.परंतु, महाराष्ट्रातील पुनर्वसन कायद्यात अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे ''इंदिरा आवास''च्या धर्तीवर अनुदान मिळावे अशी मागणी होती. गेल्यावर्षी वनविभागाने ''चांदोली''च्या ७६ धरणग्रस्तांना ही रक्कम दिली. त्यानुसार ही रक्कम देण्याची कबुली महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. धरणग्रस्तांची एकजूट, सातत्यपूर्वक मागणी, पाठपुरावा आणि लढायाचेच हे यश आहे. - कॉ. संपत देसाई, कार्याध्यक्ष, श्रमिक मुक्तिदल, महाराष्ट्र