कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी मिळणार ४३ कोटींचा निधी, लवकरच मराठा पर्यटन गाडी सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:50 IST2025-04-12T11:50:03+5:302025-04-12T11:50:21+5:30
अमृत भारत स्टेशन योजनेेअंतर्गत कायापालट

कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी मिळणार ४३ कोटींचा निधी, लवकरच मराठा पर्यटन गाडी सुरू होणार
कोल्हापूर : भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेअंतर्गत कोल्हापूरसह महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश केला जात आहे. या योजनेद्वारे कोल्हापूर रेल्वेस्थानकाला ४३ कोटींचा निधी मिळत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय रेल्वेने महाराष्ट्रासाठी विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. गोंदिया-बल्लारशाह स्थानकांमधील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्याने याचा फायदा महाराष्ट्राला होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आयआरसीटीसीकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. भारत गौरव पर्यटन गाडीने १० दिवसांच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि भव्य वारसा तसेच महाराष्ट्रातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थाने दाखविण्यासाठी एक विशेष तयार केलेला पर्यटन मार्ग असणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हातकणंगलेसाठीही ६ कोटी
कोल्हापूरसह हातकणंगले रेल्वेस्थानकांसाठी ६ कोटींचा निधीही मिळणार आहे. याशिवाय कराड स्टेशनसाठी १२.५ कोटी, सांगलीसाठी २४.२ कोटी, लोणंद जंक्शन स्टेशनसाठी १०.५ कोटी, सातारा स्टेशनसाठी ३४.३ कोटी मिळणार असून यातून या स्थानकांचाही कायापालट होणार आहे.
काम जवळपास पूर्णत्वाकडे
या उपक्रमांतर्गत कोल्हापूरसह सर्वच स्थानकांचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. अनेक स्थानकांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होतील. या स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.