रस्त्यांचे पैसे सरपंचाच्या खिशात
By Admin | Updated: July 11, 2014 00:11 IST2014-07-11T00:05:59+5:302014-07-11T00:11:29+5:30
सावर्डे बुद्रुक येथील प्रकार : तिघांच्या चौकशीची मागणी

रस्त्यांचे पैसे सरपंचाच्या खिशात
मुरगूड : रस्त्यांची कामे न करताच हजारो रुपयांची बिले संगनमताने परस्पर उचलण्याचा प्रकार कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथे घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी सरपंच डॉ. इंद्रजित पाटील, ग्रामसेविका टी. जे. अत्तार व पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. आर. खान यांची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी तसेच सावर्डे बुद्रुक ग्रामपंचायत आणि कागल पंचायत समितीकडे दिले. याप्रकरणी कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सावर्डे (ता. कागल) येथील पाटील गल्ली, काशीद अड्डा, दिरुगडे अड्डा व लक्ष्मी नगर या वसाहतीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर खडीकरण करण्याचा पंचायतीच्या सभेत ३० नोव्हेंबर २०१३ ला ठराव मंजूर केला होता; पण त्यानंतर गावातील कोणत्याच रस्त्यांची कामे झाली नाहीत. खडीकरणासाठी कुठेच मुरूम टाकला नाही; पण याबाबत ५५ हजारांची खोटी बिले सादर करून पैसे मात्र उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे, पाच वर्षांपूूर्वी पाटील गल्लीमध्ये शासनाच्या योजनेतून काँक्रिटीकरण केले होते आणि चक्क ग्रामपंचायतीने याच रस्त्यावर मुरूम टाकल्याचे दाखविल्याने त्यांचे पितळ उघडे पडले आहे. गावापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या भैरेवाडी वसाहतीच्या रस्त्यावरच काशीद अड्डा आहे. पण, या त्रिकुटाने हे दोन रस्ते वेगवेगळे आहेत, असे दाखवून बिलांची उचल केली आहे. सोनाळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या हिरुगडे अड्डयावरील ग्रामस्थांनी वर्गणी काढून खडीकरण केले होते. तसेच गावालगतच्या पश्चिमेला असलेल्या लक्ष्मी नगरकडे जाण्यासाठी काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण केले आहे. पण, या रस्त्यावर पंचायतीने मुरूम टाकल्याचे कागदोपत्री दाखविले आहे.
यासर्व भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे संपर्क साधला. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांना दिले; पण अद्याप चौकशी झाली नसल्याने ग्रामस्थांतील उद्रेक वाढला आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या निवेदनावर बाबासाहेब पाटील, धनाजी घराळ, वि. दा. पाटील, विश्वनाथ पाटील, तानाजी घराळ, कृष्णात हिरुगडे, संजय मेंगाणे, आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)ं