लक्षतीर्थ वसाहत हल्लाप्रकरणी रिंकू देसाईसह दोघांना अटक, मोबाईल लोकेशनवरून लावला शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 11:31 IST2022-06-17T11:30:44+5:302022-06-17T11:31:13+5:30
मोबाईल लोकेशनवरून कर्नाटकातील चिक्कोडीतून गुरुवारी पहाटे त्यांना ताब्यात घेतले

लक्षतीर्थ वसाहत हल्लाप्रकरणी रिंकू देसाईसह दोघांना अटक, मोबाईल लोकेशनवरून लावला शोध
कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहतमध्ये दोघांवर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा आरोप असणारा संशयित रिंकू ऊर्फ विजयसिंह वसंतराव देसाई (वय ४०, रा. बोंद्रेनगर), नीतेश तानाजी वरेकर (२६, रा. शिंगणापूर) या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. मोबाईल लोकेशनवरून कर्नाटकातील चिक्कोडीतून गुरुवारी पहाटे त्यांना ताब्यात घेतले.
वाढदिवसाचे फलक फाडल्याच्या कारणावरून फुलेवाडीत १५ मे रोजी दोन गटांत वाद झाला होता. त्यानंतर लक्षतीर्थ वसाहत येथे तलवार, चाकूने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी मुख्य संशयित रिंकू देसाईसह १६ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील १४ जणांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यांना दोन वेळा पोलीस कोठडी दिली होती.
दरम्यान, रिंकूसह दोघेजण पोलिसांच्या हाती लागत नव्हते. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक इकबाल महात यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे मोबाईल लोकेशन शोधले. ते कर्नाटकातील चिकोडीत असल्याचे कळाले. त्यानुसार तेथे सापळा रचून त्यांना अटक केली.