Kolhapur: जोतिबावर साकारणार भक्तनिवास, अन्नछत्र, कम्युनिटी हॉल; १७० कोटींचा आराखडा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:56 IST2026-03-06T11:55:29+5:302026-03-06T11:56:19+5:30

भाविकांच्या सुविधांना देणार प्राधान्य : दोन महिन्यांत कामे सुरू : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने दिली मंजुरी

Revised Rs 170 crore plan for first phase of Jyotiba temple approved | Kolhapur: जोतिबावर साकारणार भक्तनिवास, अन्नछत्र, कम्युनिटी हॉल; १७० कोटींचा आराखडा मंजूर

संग्रहित छाया

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील श्री जोतिबा मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील सुधारित आराखड्याला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या सुधारित आराखड्यासाठीचा सर्व १७० कोटींचा निधी नियोजन विभागाकडून मिळणार असून, त्यात भाविकांना केंद्रस्थानी ठेवून भक्त निवास, अन्नछत्र, पालखी मार्गाचे रुंदीकरण, सोलर व्यवस्था, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या सुधारणांचा समावेश आहे. दोन महिन्यांमध्ये आराखड्याची प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया होऊन पुढील कामाला सुरुवात होईल.

पश्चिम महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या २५० कोटींच्या आराखड्याला मागील वर्षी मे महिन्यात मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. त्यावेळी मंदिर जतन संवर्धनाच्या कामासाठीच्या ८० कोटींचा निधी नियोजन विभागाकडून दिला गेला. ही कामे सध्या सुरू आहेत. त्यापुढील १७० कोटींची कामे त्या-त्या विभागांनी आपापल्या निधीतून करावी, असे सांगण्यात आले होते.

मात्र, त्यात सुसुत्रता राहणार नसल्याने जिल्हा प्रशासनाने सगळा निधी नियाेजनकडून मिळावा, अशी मागणी केली होती. त्यावर नियोजन विभागाने भाविकांना केंद्रस्थानी ठेवून प्राधान्याने करायच्या कामांचा समावेश करून सुधारित आराखडा सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महिन्याभरापूर्वी हा सुधारित आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.

गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अभियंता सुयश पाटील उपस्थित हाेते. जिल्हाधिकाऱ्यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

ही कामे होणार (रक्कम कोटीत)

  • गायमुख ते जोतिबा पायवाट रुंदीकरण : २०.२१
  • सेंट्रल प्लाझा दुरुस्ती, विस्तार : १६.३६
  • पार्किंग : १५.७०
  • सांडपाणी व्यवस्थापन : १५.०३
  • सोलर प्लांट उभारणी : ११.५०
  • भक्तनिवास, कम्युनिटी हॉल : १२.१३
  • प्राथमिक आरोग्य सेवा, अन्नछत्र : ०९.६५
  • दक्षिणद्वार ते जोतिबा मंदिर मुख्य प्रवेशद्वार रुंदीकरण : ०९.९०
  • आपत्ती व्यवस्थापन : ७.८६
  • हुजुरवाडा इमारतीत माहिती केंद्र : ३.६६
  • मुख्य पालखी मार्ग विस्तारीकरण : ८.२५
  • भाविकांसाठी सुविधा केंद्र : ९.८७
  • कुशिरे ते गायमुख पादचारी मार्ग व पार्किंग विकास : ९.७५
  • कायमस्वरूपी पाणीपुरवठा : १०.७४
  • घनकचरा व्यवस्थापन : ४.८८
  • बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण : ५.००
  • एकूण रक्कम : १७०.४९ कोटी

जोतिबा हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील कामे लवकर सुरू करून वेळेत पूर्ण करा. दोन महिन्यांत आराखड्याचे विस्तृत अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यादेश करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल यासाठी प्राधान्य द्या. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title : कोल्हापुर: ज्योतिबा मंदिर में भक्त निवास बनेगा; 170 करोड़ की योजना मंजूर।

Web Summary : कोल्हापुर के ज्योतिबा मंदिर के विकास के लिए 170 करोड़ रुपये मंजूर। भक्त निवास, भोजन सेवाएँ, सड़क चौड़ीकरण और कचरा प्रबंधन शामिल। दो महीने में काम शुरू।

Web Title : Kolhapur's Jyotiba Temple to get devotee facilities; ₹170 crore plan approved.

Web Summary : The Jyotiba temple development plan in Kolhapur gets ₹170 crore for devotee facilities. Includes accommodation, food services, road widening, and waste management. Work to begin in two months.