शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हे नोंदवा
By Admin | Updated: April 6, 2017 14:55 IST2017-04-06T14:55:18+5:302017-04-06T14:55:18+5:30
काँग्रेसची मागणी : जबाबदार घटकावर कारवाई करा

शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी गुन्हे नोंदवा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ६ : राज्यात कर्ज वसूलीच्या तगाद्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांवर राज्य शासनाने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवावेत अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी यांच्याकडे केली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले की, कर्ज वसुलीसाठी तगादा म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यात दोन वर्षात आठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ८० टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वित्तीय संस्थांकडून घेतलेले अर्ज न फेडता आल्याने झालेल्या आहेत, हेही राज्य सरकारने मान्य केले आहे.
कर्ज फेडीसाठी बँकांचा तगादा, सावकारांची आरेरावी, धमक्या यांचा भडीमार चालू असतो. कर्जबाजारीपणा नाचक्की, नामुष्की पदरात पडणार या चिंतेने आत्महत्या वाढत आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अल्पभूधारक व छोटे शेतकरीच आहेत.
शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे नोंदवावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी या मागण्या शासन दरबारी पोहचविण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी यांनी शिष्टमंडळास सांगितले.
या शिष्टमंडळात, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक सर्वश्री प्रविण केसरकर, मोहन सालपे, संजय पाटील, राज्य ग्राहक संरक्षक परिषदेचे सदस्य संजय पाटील, गणी आजरेकर, संपतराव पाटील, महमद शेख, दुर्वास कदम, संग्राम गायकवाड, साताप्पा कांबळे, अनिल भोसले, रविंद्र राऊत, सरपंच तानाजी सासने, प्रदीप पाटील आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)