Kolhapur- शिवाजी विद्यापीठाचे नामांतर: महिन्यात नाव बदला, अन्यथा..; आमदार टी.राजासिंह यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:15 IST2025-03-18T12:14:46+5:302025-03-18T12:15:20+5:30

'पानसरे यांच्या पुस्तकावर बंदी घाला'

Rename Shivaji University to Chhatrapati Shivaji Maharaj University' within a month otherwise march to Vidhan Bhavan MLA T Rajasingh gave a warning | Kolhapur- शिवाजी विद्यापीठाचे नामांतर: महिन्यात नाव बदला, अन्यथा..; आमदार टी.राजासिंह यांनी दिला इशारा

Kolhapur- शिवाजी विद्यापीठाचे नामांतर: महिन्यात नाव बदला, अन्यथा..; आमदार टी.राजासिंह यांनी दिला इशारा

कोल्हापूर : औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ एका झटक्यात केले, अहमदनगरचे नाव त्वरित बदलले. आता शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्यासाठी कोण विरोध करतंय त्यांना आम्ही पाहून घेऊ, असे आव्हान देत येत्या एका महिन्यात विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामांतर करा अन्यथा हाच मोर्चा विधानभवनावर येईल, असा इशारा भाग्यनगरचे (तेलंगणा) आमदार टी. राजासिंह यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला. तुम्ही नाव बदलले नाही तर आम्ही विद्यापीठाच्या इमारतीवर चढून नाव बदलू, असेही आव्हान त्यांनी दिले.

शिवाजी विद्यापीठाचे नामांतर करण्यासाठी हिंदू राष्ट्र समिती व हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सनातन संस्थेचे प्रमुख अभय वर्तक, सत्यजित कदम, संयोजक सुनील घनवट, प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

टी. राजासिंह म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव चुकीच्या पद्धतीने घेतले तर त्यांना सोडणार नाही. हे नाव पूर्ण न घेणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून त्यांनी अधिवेशन काळात नामांतराची प्रक्रिया पूर्ण करून येत्या महिनाभरात हे नाव बदलावे. अन्यथा विद्यापीठाच्या इमारतीवर चढून मावळे नावात बदल करतील.

अभय वर्तक म्हणाले, पुरोगामी मंडळींना छत्रपतींची हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ही ओळख मिटवायची असल्यानेच ते त्यांचा उल्लेख एकेरी करतात. सत्यजित कदम म्हणाले, लोकप्रतिनिधींनीच नामविस्तारासाठी पुढाकार घ्यावा. यावेळी आनंदराव काशीद, श्रावण मोहिते, कुणाल मालुसरे, रुपाराणी निकम, जयसिंगराव शिंदे उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठ म्हणजे जेएनयूचा अवतार

विद्यापीठातील छत्रपतींच्या पुतळ्यावर भगवा ध्वज नाही. तो मुद्दामहून लावला जात नाही. हे विद्यापीठ जेएनयूचा दुसरा अवतार बनले आहे. मात्र, येथे छत्रपतींच्या विचारांचे कार्य सुरू राहण्यासाठी हा लढा कायम ठेवणार असल्याचा इशारा वर्तक यांनी दिला.

पानसरे यांच्या पुस्तकावर बंदी घाला

गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकातून महाराजांचा अवमान होत असल्याने या पुस्तकावर बंदी घाला, अशी मागणी वर्तक व घनवट यांनी केली.

मुख्यमंत्र्यांकडे या केल्या मागण्या

शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने हा प्रस्ताव संमत करा. शासकीय दस्तऐवज, अधिसूचना व प्रमाणपत्रांमध्ये त्वरित सुधारणा करा, विद्यापीठाच्या आवारात भव्य भगवा झेंडा उभारा, ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकावर तत्काळ बंदी घाला.

Web Title: Rename Shivaji University to Chhatrapati Shivaji Maharaj University' within a month otherwise march to Vidhan Bhavan MLA T Rajasingh gave a warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.