कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटतेय; आधुनिकीकरणाला वेग, ७७ टक्के काम पूर्ण
By संदीप आडनाईक | Updated: March 27, 2026 17:23 IST2026-03-27T17:21:01+5:302026-03-27T17:23:32+5:30
मुख्य इमारत, पोर्च, प्रतीक्षालय, शौचालयाचे काम पूर्ण, अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू

कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटतेय; आधुनिकीकरणाला वेग, ७७ टक्के काम पूर्ण
संदीप आडनाईक
कोल्हापूर : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या कोल्हापूररेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामांनी वेग घेतला असून, एकूण कामाची ७७ टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली आहे. मुख्य इमारत, पोर्टिको, प्रतीक्षालय, शौचालये यांसह अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. आता रस्ता रुंदीकरण, लँडस्केपिंग, रस्ता पृष्ठभाग, पादचारी मार्गाचे नूतनीकरण या कामांना वेग आला आहे. सप्टेंबर २०२६ अखेर ही सर्व कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ४३ कोटी ३ लाखांच्या निधीतून कोल्हापूर आणि हातकणंगले या स्थानकांच्या पुनर्विकास कामांचा समावेश आहे. या निधीतून एसी वेटिंग रूम, महिला प्रतीक्षालय, नवीन शौचालय ब्लॉक, रिझर्व्हेशन ऑफिस, नवीन पोर्टिको ही कामे अंतिम अवस्थेत आहेत. प्लॅटफॉर्म सर्फेसिंगचे कामही प्राधान्याने पूर्ण झाले आहे.
दरम्यान, विद्यमान इमारतीचे सुधारणा काम ८० टक्के पूर्ण झाले असून प्लॅटफॉर्म-१ वरील शेल्टर ९८ टक्के, फसाड ९७ टक्के, मुख्य प्रवेश आणि व्हीआयपी लॉबी ९५ टक्के पूर्ण झाली आहे. फूट ओव्हर ब्रिजचे काम ४७ टक्के, तर सर्क्युलेटिंग एरिया आणि पार्किंगचे काम १५ टक्के प्रगतीत आहे. प्रकाश योजना, तसेच इतर कामे सध्या सुरू आहेत. लिफ्ट, एस्केलेटर, आसन व्यवस्था, तसेच काही सार्वजनिक सुविधा ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. आर्थिक प्रगती ७०.१८ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, हे काम ३१ जुलै २०२६ पर्यंत अपेक्षित आहे.
सुरू असलेली कामे
- एसी वेटिंग रूम
- महिला वेटिंग रूम
- प्लॅटफॉर्म क्र. १ (नवीन), क्र. २ आणि ३ येथील शौचालय ब्लॉक
- नवीन बुकिंग ऑफिसजवळ शौचालय
- रिझर्व्हेशन ऑफिस
- नवीन पोर्टिको
-विद्यमान इमारतीचे काम -८०%
-सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग -१५ %
-फूट ओव्हर ब्रिज - ४७%
-प्लॅटफॉर्म १ (नवीन) शेल्टर (सीओपी)-९८%
-फसाड -९७ %
-मुख्य प्रवेश व बाहेर पडण्याचे गेट-९५ %
-व्हीआयपी प्रवेश लॉबी-९५%
कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण वेगाने सुरू असून प्रवाशांना अधिक आधुनिक, स्वच्छ आणि सोयिस्कर सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. - हेमंत बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग.