कोल्हापुरातून २६५० अग्निवीरांची विक्रमी भरती, प्रशिक्षणासाठी झाले रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:03 IST2026-01-27T16:02:18+5:302026-01-27T16:03:00+5:30
महाराष्ट्रातील एका एकमेव आर्मी रिक्रुटिंग ऑफिसमधून झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक भरती

संग्रहित छाया
कोल्हापूर : महाराष्ट्रातील आर्मी रिक्रुटिंग ऑफिस, कोल्हापूर यांनी सुमारे २६५० अग्निवीरांची भरती करून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्रातील एका एकमेव आर्मी रिक्रुटिंग ऑफिसमधून झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक भरती आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी कर्नल प्रशांत सिंग, डायरेक्टर रिक्रुटिंग आणि लेफ्टनंट कर्नल संबित पात्रा, रिक्रुटिंग मेडिकल ऑफिसर, एआरओ कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली तसेच मेजर जनरल एस. पी. विश्वासराव, अतिरिक्त महासंचालक (भरती), मुख्यालय रिक्रुटिंग झोन, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाली.
ही भरती प्रक्रिया कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच गोव्यातील दोन जिल्हे, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा येथील उमेदवारांसाठी राबविण्यात आली. या प्रक्रियेचा उद्देश परिसरातील सर्वोत्तम युवकांची निवड करून त्यांना ‘अग्निवीर’ म्हणून देशसेवेची संधी उपलब्ध करून देणे हा होता.
निवड झालेल्या अग्निवीरांना विशेष बसद्वारे त्यांच्या संबंधित रेजिमेंटल केंद्रांकडे रवाना करण्यात आले. भरती निकाल १३ जानेवारी रोजी जाहीर झाला होता आणि १८ जानेवारी रोजी पहिल्या तुकडीला प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले. हे सर्व आर्मी रिक्रुटिंग ऑफिस, कोल्हापूर, १०९ इन्फंट्री बटालियन (टीए), मुख्यालय रिक्रुटिंग झोन, पुणे, तसेच नागरी प्रशासन आणि पोलिस विभाग यांच्या उत्कृष्ट समन्वयाने व अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले.
आमच्या मुलाची निवड झाल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे. देशसेवा करण्याची त्याची नेहमीच इच्छा होती आणि तो नक्कीच आम्हांला अभिमान वाटावा असे कार्य करील. - पालक