दुर्मीळ म्हांडूळ सापाची तस्करी

By Admin | Updated: August 26, 2015 00:25 IST2015-08-26T00:25:09+5:302015-08-26T00:25:09+5:30

पाचजणांच्या टोळीस पकडले : दोन लाखाचे दोन सर्प हस्तगत

Rarely snake charmer | दुर्मीळ म्हांडूळ सापाची तस्करी

दुर्मीळ म्हांडूळ सापाची तस्करी

मिरज : गुप्तधन व पैशाचा पाऊस पाडण्याच्या विधीसाठी दुर्मीळ म्हांडूळ जातीच्या सापाची तस्करी व विक्री करणाऱ्या पाचजणांच्या टोळीस पोलिसांनी बेळंकी येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून म्हांडूळ जातीचे दोन सर्प, तीन मोटारसायकली असा दोन लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला. सर्प तस्करांच्या या टोळीस वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांना सापांची तस्करी करणारी पाचजणांची टोळी सर्पविक्री करण्यासाठी बेळंकी येथे आल्याची माहिती मिळाली. हवालदार संजय चव्हाण, प्रशांत कोळी, सागर आंबेवाडीकर, बसवराज शिरगुप्पी यांच्या पथकाने या तस्करांच्या टोळीशी संपर्क साधून, गुप्तधन काढण्यासाठी होमहवन करण्यासाठी म्हांडूळ सर्प खरेदी करण्याची तयारी दर्शविली. सापांचा सौदा ठरल्यावर बेळंकी येथील गव्हाणे पेट्रोल पंपाजवळ पाचजणांच्या टोळीस दोन सापांसह रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे तब्बल पाच किलो वजनाचे दोन साप हस्तगत करण्यात आले.
सापांची तस्करी करणाऱ्या शहाजी मधुकर जाधव (वय २२, रा. बेळंकी रोड, खटाव), रमेश बाळासाहेब कोळेकर (२२, रा. इरळी, ता. कवठेमहांकाळ), अमोल तम्माण्णा चौगुले (२२), विकास तम्माण्णा चौगुले (१९), अनिल संभाजी खताळ (२३, रा. सलगरे, ता. मिरज) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा वन विभागाकडे वर्ग करून आरोपींना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. म्हांडूळ साप तस्करीचे प्रकार वाढत चालले असून त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. (वार्ताहर)


एक आरोपी खासगी बँकेत व्यवस्थापक
पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी अनिल खताळ हा एका खासगी बॅँकेत व्यवस्थापक आहे. अमोल चौगुले हा एमबीएचे शिक्षण घेत आहे. त्याचा भाऊ विकास चौगुले हा बारावीत शिकत आहे, तर रमेश कोळेकर हा मुंबईत रिक्षाचालक म्हणून काम करतो. यावरून उच्चशिक्षित तरुण पैसे कमाविण्यासाठी सापांच्या तस्करीत गुंतल्याचे निष्पन्न झाले आहे. पकडलेल्या टोळीने दुर्मीळ म्हांडूळ साप कोठून आणले, आतापर्यंत त्यांची कोणाला विक्री केली आहे, याबाबत चौकशी करण्यात येत आहे.

८० लाखांचा सौदा
पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून दोन म्हांडूळ सापांचा ८० लाखात सौदा ठरविला होता. पोलीस दोन दिवस या तस्करांच्या संपर्कात होते. गिऱ्हाईक बनून साध्या वेशात खासगी वाहनातून गेलेल्या पोलिसांनी टोळीस रंगेहात पकडले.

Web Title: Rarely snake charmer