शाहू महाराजांची राजकोटमधील दुर्मिळ छायाचित्रे झाली उपलब्ध, १९११ च्या ग्रंथामधून आणखी प्रकाशझोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:39 IST2025-06-26T16:38:51+5:302025-06-26T16:39:56+5:30

इंद्रजीत सावंत यांची माहिती 

Rare photographs of Shahu Maharaj from Rajkot made available | शाहू महाराजांची राजकोटमधील दुर्मिळ छायाचित्रे झाली उपलब्ध, १९११ च्या ग्रंथामधून आणखी प्रकाशझोत

शाहू महाराजांची राजकोटमधील दुर्मिळ छायाचित्रे झाली उपलब्ध, १९११ च्या ग्रंथामधून आणखी प्रकाशझोत

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी अखंड संशोधन सुरू असते. यातूनच महाराज गुजरातमधील राजकोट येथे ज्या ‘राजकुमार कॉलेज’ येथे शिकावयास होते. या कॉलेजवरील ग्रंथांचे १९११ साली प्रकाशित झालेले सात खंड येथील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या संग्रहात दाखल झाले आहेत. सावंत यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

या ग्रंथांमध्ये महाराजांचे अनेक दुर्मिळ फोटो असून, त्यांचे डिजिटायझेशन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भावनगरचे भावसिंहजी महाराज हे शाहू महाराजांचे परममित्र आणि राजकोट येथील सहअध्यायी होते. या स्नेहापोटी शाहू महाराज यांनी जुना राजवाडा ते नवीन राजवाडा या राजमार्गाला ‘भावसिंहजी रोड’ असे नाव दिले. भावसिंहजी यांनीही महुआ येथे बांधलेल्या राजवाड्याला ‘शाहू पॅलेस’ असे नाव दिले.

या भावसिंहजी महाराजांनी राजकोट येथील राजकुमार कॉलेजवर ‘फोर्टी इयर्स ऑफ द राजकुमार कॉलेज’ हा सात खंडात्मक ग्रंथ लिहिला. छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक वडील छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचे शिक्षणही येथेच झाले होते. त्यांच्यासह शाहू महाराजांचे अनेक दुर्मिळ असे फोटो या ग्रंथात आहेत.

या राजकोट कॉलेजमध्ये सन १८८५ ते १८८९ पर्यंत शाहू महाराजांचे वास्तव्य होते. महाराजांनी याठिकाणी शालेय शिक्षणाबरोबर कवायत, तालीम, घोडेस्वारी, नेमबाजी या मर्दानी खेळांसह क्रिकेट, फुटबॉल यासारख्या मैदानी खेळांचेही प्रशिक्षण घेतले होते. पत्रकार परिषदेला ओंकार कोळेकर, किरणसिंह चव्हाण, हर्षल सुर्वे, अमित आडसुळे, दिगंबर भोसले, शुभम शिरहट्टी आणि सर्जेराव कांबळे उपस्थित होते.

Web Title: Rare photographs of Shahu Maharaj from Rajkot made available