सत्ताधाऱ्यांचे लागेबांधे असल्यानेच कारागृह घोटाळ्याचा तपास नाही, राजू शेट्टींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:55 IST2025-06-21T16:54:31+5:302025-06-21T16:55:48+5:30
भाजपला तुरुंगात जावून आलेलेच आवडतात

सत्ताधाऱ्यांचे लागेबांधे असल्यानेच कारागृह घोटाळ्याचा तपास नाही, राजू शेट्टींचा आरोप
कोल्हापूर : अपात्र ठेकेदार सुनील झंवर याला कारागृहाच्या पुरवठ्याचा ठेका देणे, तेजस मोरे याचा कारागृहातील अवैध वावर यातूनच कारागृहातील ५०० कोटींच्या घोटाळ्याशी कोणाचा संबंध आहे, हे स्पष्ट होते. या दोघांचेही सत्ताधाऱ्यांशी लागेबांधे असल्यानेच या घोटाळ्याचा तपास ठप्प असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
शेट्टी म्हणाले, मी दीड महिन्यापूर्वी याबाबत सुजाता सौनिक यांना भेटलो. तेव्हा त्यांनी उत्साह दाखवला. परंतु, आता त्याच म्हणत आहेत की वरिष्ठ निर्णय घेतील. रायसोनी ग्रुपमधील १२०० कोटी रुपयांच्या पतसंस्था घोटाळ्यातील आरोपी जो अटकेत होता, त्याच झंवर याला हा ठेका कसा दिला गेला, मंत्रालयात जाणाऱ्या सर्वांच्या गाड्या तपासल्या जात असताना या तेजस मोरेची काळी गाडी (क्रमांक एमएच-०१ ईजे २७०७) थेट आत कशी पार्क होते, याचा उलगडा झाला पाहिजे. अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपकेर हे या सर्व घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
भाजपला तुरुंगात जावून आलेलेच आवडतात
‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणणाऱ्या भाजपला काय झालेय मला समजेना, असे सांगून शेट्टी म्हणाले, साखर कारखाने विकणारे, भ्रष्टाचार करणारे आणि तुरुंगातून बाहेर पडलेलेच भाजपवाल्यांना कसे आवडतात, हा खरा प्रश्न आहे.
..तर आंदोलन ठरलेलेच
अजूनही मी चौकशीची मागणी करत आहे. अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून अधिवेशनातही हा घोटाळा मांडला जाईल. त्यातूनही काही पुढे झाले नाही तर मग काय आंदोलन ठरलेलेच आहे, असेही शेट्टी यांनी जाहीर केले.