पालकमंत्रिपदावरुन कोल्हापुरातील शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:12 IST2025-01-21T18:11:27+5:302025-01-21T18:12:31+5:30
आबिटकर यांना मंत्रिपद मिळाल्याने नाराजी : शिंदेसेनेसह महायुतीतही जाेरदार चर्चा

पालकमंत्रिपदावरुन कोल्हापुरातील शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर अस्वस्थ
कोल्हापूर : प्रकाश आबिटकर यांची मंत्रिपदी निवड झाल्यानंतर शिंदेसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे तीनदा आपल्याला मंत्री आणि पालकमंत्रिपद मिळाले नाही याबद्दल उघड नाराजी केल्यामुळे आबिटकर यांचे मंत्रिपद त्यांच्याच पक्षातील नेत्याला पचनी पडले नसल्याची चर्चा महायुतीसह लोकांत सुरू झाली आहे. आता रोज जाहीरपणे बोलून काहीच उपयोग नाही अशी स्थिती असताना क्षीरसागर त्यांचे दु:ख का व्यक्त करीत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
क्षीरसागर हे महाविकास आघाडीच्या काळात आणि नंतर महायुतीच्या काळात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ‘मित्रा’ या संस्थेचे ते उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहतात. तसे आताही ते कॅबिनेट मंत्रीच आहेत. आता ते तिसऱ्यांदा आमदार झाल्यावर त्यांच्या या महत्त्वाकांक्षेने पुन्हा उचल खाल्ली. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही त्यांनी केले. परंतु, त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी आबिटकर यांना थेट कॅबिनेटमंत्रिपद दिले.
पालकमंत्रिपद म्हणजे एका अर्थाने जिल्ह्याचे नेतृत्वच त्या नेत्याकडे येते. प्रशासनात त्यांच्या शब्दाला कमालीचे वजन असते. निधीवाटपापासून अनेक गोष्टींचा निर्णय त्यांच्या हातात असतो. त्यामुळे या वेळेला संधी असतानाही ते आपल्याला न मिळाल्याचे दु:ख क्षीरसागर यांना झाले आहे. शिवसेना फुटल्यानंतर मी सर्वांत प्रथम एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिलो, शहरात शिंदेसेनेची ताकद वाढवली. त्यामुळे नुसते मंत्रिपदच नाही, तर पालकमंत्रिपदही आपल्याला मिळायला हवे असा त्यांचा होरा होता; परंतु, तो चुकीचा ठरल्याने ते कासावीस झाल्याचे दिसत आहे.
आबिटकर यांना मंत्रिपद देताना नवे नेतृत्व, स्वच्छ चेहरा, ग्रामीण भागाच्या विकासाचा विचार झालेला असू शकतो. फारसे राजकीय पाठबळ नसताना सलग तीनवेळा तगड्या विरोधकाला पराभूत करून ते विजयी झाले हीसुद्धा त्यांच्या कॅबिनेटसाठीची महत्त्वाची पात्रता आहे. तिसऱ्यांदा आमदार झालेले चंद्रदीप नरके यांनाही मंत्रिपदाची आशा होती; परंतु, ते मिळाले नाही म्हटल्यावर सत्ताधारी आमदार म्हणून त्यांनी काम सुरू केले. आदळआपट करीत बसलेले नाहीत. परंतु, आबिटकर यांना मंत्रिपद जाहीर होताच क्षीरसागर यांनी ‘माझाही नंबर लागला असता. मंत्रिपद मिळाले असते तर मतदारसंघासाठी चांगले झाले असते,’ अशी भाषा वापरली. मंत्री झाल्यानंतर जेव्हा आबिटकर पहिल्यांदा कोल्हापुरात आले त्या दिवशीही आपल्याला संधी मिळायला हवी होती, असे वक्तव्य क्षीरसागर यांनी केले होते. शिवाय त्यांच्या स्वागताकडेही ते फिरकले नाहीत.
पालकमंत्रिपदही खटकले
आबिटकर आणि हसन मुश्रीफ मंत्री झाल्यानंतर पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याची प्रचंड उत्सुकता होती. अशातच पालकमंत्रिपद आबिटकर यांना मिळाल्यानंतर रविवारी झालेल्या भोई समाजाच्या कार्यक्रमात त्यांनी पद न मिळाल्याची ठसठस पुन्हा व्यक्त केली. वारंवार व्यक्त होणारी नाराजी आबिटकर यांना मिळालेली संधी त्यांना खूपच त्रासदायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.