Kolhapur Crime: कोट्यवधींच्या फसवणुकीचा सूत्रधार राजेंद्र नेर्लेकर अटकेत, दीड वर्षापासून होता पसार
By उद्धव गोडसे | Updated: October 13, 2025 16:45 IST2025-10-13T16:45:06+5:302025-10-13T16:45:47+5:30
हुपरीतील एका जैन मुनींचीही त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस येताच खळबळ उडाली होती. याबाबत मुनींसह गुंतवणूकदारांनी नेर्लेकर याच्या घरासमोर उपोषण केले होते

Kolhapur Crime: कोट्यवधींच्या फसवणुकीचा सूत्रधार राजेंद्र नेर्लेकर अटकेत, दीड वर्षापासून होता पसार
कोल्हापूर : गुंतवणुकीवर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असलेला राजेंद्र भीमराव नेर्लेकर (वय ४८, रा. शिवाजीनगर, हुपरी) याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १३) अटक केली. जानेवारी २०२४ पासून तो पसार होता. इचलकरंजी येथील न्यायालयात हजर केल असता त्याला पोलिस कोठडी मिळाली.
विविध प्रकारचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी नेर्लेकर याच्यावर हुपरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आंध्रप्रदेशातही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आंध्रप्रदेश पोलिसांनी त्याला अटकही केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्यावर हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
हुपरीतील एका जैन मुनींचीही त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस येताच खळबळ उडाली होती. याबाबत मुनींसह गुंतवणूकदारांनी नेर्लेकर याच्या घरासमोर उपोषण केले होते. त्यानंतर अटकेच्या भीतीने नेर्लेकर पसार झाला होता. जानेवारी २०२४ मध्ये त्याच्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची फिर्याद हुपरी पोलिस ठाण्यात दिली होती. अखेर २० महिन्यांनी त्याला अटक करण्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले.
फसवणुकीची व्याप्ती वाढली
नेर्लेकर याने अनेकांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. हुपरी पोलिस ठाणे आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आलेल्या तक्रार अर्जांनुसार १९ कोटींची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.