कोल्हापूर : पावसाने बहुतांश जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. यामुळे धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक सुरु झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. आज, शुक्रवारी पहाटे ४ वाजता राधानगरी धरणाचे २ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
३ व ६ नंबरच्या दरवाज्यातून २८५६ क्युसेक व बीओटी पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेक असा एकूण ४३५६ क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. परिणामी भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील ७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे.
कोल्हापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून रात्री पावसाने जोर धरला आहे. तर सकाळच्या सुमारास अधून-मधून हलक्या सरी कोसळत आहेत. यामुळे हवेत गारवा पसरला आहे.कोकणात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली आहे. पिकांना पावसाची गरज होती. राज्यातील काही भागांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. विशेष म्हणजे दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मान्सून लवकरच दाखल झाला होता. सुरुवातीच्या काळात दमदार पाऊसही झाला. मात्र, काही दिवसापासून पावसाने उघडीप घेतली होती.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा काही भागांमध्ये दिला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्राला मान्सूनचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यातील काही भागांत अतिमुसळधार पाऊस होणार आहे.