Rain In Kolhapur: पन्हाळ्यावर येणारा एकमेव रस्ता खचला; मार्गच बंद झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:49 IST2021-07-23T16:48:23+5:302021-07-23T16:49:58+5:30
Landslide on Panhala road: भूस्खलनामुळे वीजेच्या खांबासह व सार्वजनिक बांधकाम खात्याने अलिकडच्या काळात बांधलेल्या कठड्यासह निम्मा रस्ता खचल्याने गडावर येण्याचा प्रमुख मार्ग बंद झाला आहे.

Rain In Kolhapur: पन्हाळ्यावर येणारा एकमेव रस्ता खचला; मार्गच बंद झाला
पन्हाळा : पन्हाळा- बुधवारपेठ रस्ता भुस्खलनाने खचल्यामुळे पन्हाळ्यावर येण्याचा प्रमुख मार्ग बंद झाला आहे .
गेल्या चोवीस तासात २९५ मि.मि.इतका जोरदार सलग पडणारा पाऊस त्याचा मोठा प्रवाह रस्त्याच्या उताराच्या बाजुने मोठ्या प्रमाणात वाहात असल्याने सकाळी साडेसहाचे दरम्यान हा रस्ता घसरला चार दरवाजा येथील जुना नाका ते १८८८ साली बांधलेला संरक्षक कठड्यापर्यंतचा रस्ता उताराच्या बाजूने खाली ६०फुट मंगळवार पेठेत घसरला.
भूस्खलनामुळे वीजेच्या खांबासह व सार्वजनिक बांधकाम खात्याने अलिकडच्या काळात बांधलेल्या कठड्यासह निम्मा रस्ता खचल्याने गडावर येण्याचा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. सलग दुसऱ्या वेळी हा रस्ता बंद झाला आहे २०१९ साली रेडे घाट आणि मार्तंड परिसरात पाण्याच्या प्रवाहामुळे खालून माती घसरून पन्हाळ्यावर येणारा रस्ता खचला होता याचे दुरुस्तीसाठी नऊ महिन्यांचा कालावधी गेला होता चालुवर्षी गडावरील सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे खिळखीळा झालेला या परिसराचे भुस्खलन झाले यामुळे पायथ्याला असणाऱ्या मंगळवारपेठेतील घरांचे नुकसान झाले आहे.
अजुनही याठिकाणी सादोबा तलावाचा धोका निर्माण झाला असुन तलावात सध्या बाहेरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने तलावाची पुर्वबाजु कमकुवत झाली आहे दरम्यान पन्हाळ्यावर येण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तीन दरवाजातील मार्गाचा वापर होता पण तोही रस्ता दोन दिवसांपासून खचू लागल्याने गडावर येण्याचा मार्गच सध्या बंद झाला आहे.