A raid on six plastic sales professionals | प्लास्टिक विक्री करणाऱ्या सहा व्यावसायिकांवर छापे

प्लास्टिक विक्री करणाऱ्या सहा व्यावसायिकांवर छापे

ठळक मुद्देप्लास्टिक विक्री करणाऱ्या सहा व्यावसायिकांवर छापे पथकाकडून कारवाईत सातत्य नसल्याचे स्पष्ट

कोल्हापूर : शहरात प्लास्टिकबंदी करण्यात आल्यानंतरही व्यापारी, विक्रेते प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाकडून होणाऱ्या कारवाईत सातत्य नसल्यामुळे पूर्णत: प्लास्टिकबंदी झालेली नाही, हे मंगळवारी झालेल्या कारवाईतून स्पष्ट झाले.

आरोग्य विभागामार्फत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांवर मंगळवारी आरोग्य विभागाने छापे टाकून त्यांच्याकडून होणारी प्लास्टिक विक्री बंद पाडली. रंकाळा रोड, शाहूपुरी व पंचशील हॉटेल परिसरांत ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये इन्टाईस गेम झोन, राजेंद्र कोळी, हॉटेल कैलरू, शक्ती फ्लॉवर्स, तुलीप फ्लॉवर्स व अवंती वडा सेंटर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून प्लास्टिकविरोधी पथकाने प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे तीस हजार रुपये दंड वसूल केला.

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक व थर्माकोल, इत्यादींपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने प्लास्टिकबंदी करण्यात आल्यानंतरही त्याची राजरोसपणे विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुळात ज्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांसह प्रतिबंधित वस्तू तयार केल्या जातात, तेथेच छापे टाकल्या पाहिजेत. मात्र पथकांकडून किरकोळ विक्रेते यांच्यावर आणि जेमतेम कारवाई केली जात आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीचा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झालेला नाही.

सदरची कारवाई आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, मुनीर फरास, करण लाटवडे, श्रीराज घोळकर, सुशांत कावडे, नंदकुमार पाटील यांनी केली.
 

 

Web Title: A raid on six plastic sales professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.