Kolhapur: हुपरीत बनावट दारु निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर छापा, तिघा आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:38 IST2025-12-25T16:37:38+5:302025-12-25T16:38:41+5:30
दारु तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट, दोन वाहने व मोबाईल असे २५ लाख ४० हजार रुपयांचे साहित्य जप्त

Kolhapur: हुपरीत बनावट दारु निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर छापा, तिघा आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी
हुपरी: रेंदाळ येथील अंबाई नगरमधील एका हॉटेलच्या पाठीमागे बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये बनावट दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. यामध्ये कालबाह्य झालेले देशी दारुचे बॉक्स, मोकळ्या बाटल्या, दारु तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट, दोन वाहने व मोबाईल असे २५ लाख ४० हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी वसंतराव धनाजी पाटील (वय.५२), अरुण भाऊ बुरुंगले (३२), आमिर सज्जन शिकलगार (४४ सर्व रा. हुपरी) या संशयित तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या धडक कारवाईनंतर बनावट दारू विक्री करणारे रॅकेट उघडकीस आल्याने बार चालकाचे धाबे दणाणले आहे.
या छाप्याची व्याप्ती मोठी असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी दिवसभर याठिकाणी ठाण मांडून होते. मुद्दत संपलेल्या दारुमध्ये स्पिरीट मिसळून ती पुन्हा बाजारात आणण्याचे प्रयत्न सुरु होता. अज्ञाताने याबाबतची माहिती एक्साईज विभागाला कळवली होती. त्यानुसार एक्साईजच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला असता हा प्रकार समोर आला. पथकाने याठिकाणी स्पिरीट, दोन दोन वाहने व मोबाईल असे २५ लाख ४० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.