राहुल देशपांडे, प्रियांका बर्वेंंनी रंगवली सुरेल सायंकाळ; ‘सूर ज्योत्स्ना’ सोहळ्याची सांगितिक पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 23:25 IST2026-03-28T23:24:58+5:302026-03-28T23:25:39+5:30

काळजात घर करणाऱ्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध, ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. या गाण्याने या मैफलीची सांगता झाली.

Rahul Deshpande, Priyanka Barve created a melodious evening; Musical celebration of Lokmat ‘Sur Jyotsna’ festival | राहुल देशपांडे, प्रियांका बर्वेंंनी रंगवली सुरेल सायंकाळ; ‘सूर ज्योत्स्ना’ सोहळ्याची सांगितिक पर्वणी

राहुल देशपांडे, प्रियांका बर्वेंंनी रंगवली सुरेल सायंकाळ; ‘सूर ज्योत्स्ना’ सोहळ्याची सांगितिक पर्वणी

संदीप आडनाईक

कोल्हापूर : ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड्स’निमित्त आयोजित राहुल देशपांडे यांच्या ‘राहुल देशपांडे कलेक्टिव’ या विशेष मैफलीने कोल्हापूरकर रसिकांना सुरेल पर्वणी दिली. गायिका प्रियंका बर्वे हिने राहुल यांना साथ दिली. विविध संगीतप्रकारांचा सुंदर मिलाफ साधणाऱ्या या मैफलीने ‘सूर ज्योत्स्ना’ सोहळ्याला चार चांद लावत कोल्हापुरातील रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.

सायबर कॉलेज परिसरातील आनंद भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात शास्त्रीय, नाट्यसंगीत, भावगीत, अभंग आणि चित्रपटगीतांचा बहारदार संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात राहुल यांनी ‘तुज मागतो मी आता, मज द्यावे एकदंत’ या भक्तिगीताने केली. त्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत लाभलेलेले शब्दप्रभू गझलकार सुरेश भट यांचे ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ही गझल राहुल आणि प्रियंका यांच्या युगल गायनातून रंगली. प्रियांका यांनी ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मी मज हरपून बसले गं’, ‘मी डोलकर, डोलकर, वल्हव रे नाखवा हो’ आणि ‘मी रात टाकली’ ही भावगीतं सादर करत मैफलीला वेगळ्या उंचीवर नेली. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

राहुल देशपांडे यांनी ‘राधा धर मधु मिलिंद जय जय’ हे शास्त्रीय अंग असलेले गीत प्रभावीपणे सादर करत आपली गायकीची ताकद दाखवून दिली. त्यानंतर ‘पाणी पाणी रे’ हे प्रियांका आणि राहुल यांच्या युगल सादरीकरणातून विशेष गाजले. हिंदी चित्रपट संगीताची झलक देताना ‘हम बेवफा हरगिज ना थे’ आणि ‘मोहे रंग दे’ ही गाणी राहुल देशपांडे यांनी वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने सादर केली. राहुल यांनी सादर केलेल्या मराठी सुगम आणि लोकसंगीताचा ठसा उमटवणारी ‘जीव रंगला दंगला’ या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. पाठोपाठ प्रियंका यांनी सादर केलेल्या ‘मला म्हणत्यात हो पुण्याची मैना’ या लावणी गीताला सखींनी टाळ्याशिट्यांच्या कडकडाटात दाद दिली. ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. या गाण्याने या मैफलीची सांगता झाली.

वादकांच्या साथसंगतीमुळे गाण्याला मिळाली उंची

राहुल देशपांडे कलेक्टिवमधील वादकांच्या उत्कृष्ट साथसंगतीमुळे प्रत्येक गाण्याला वेगळी उंची मिळाली. तबल्यावर आदित्य आठल्ये, हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी, की बोर्डवर विशाल धुमाळ, बासरीसाठी वरद कठापूरकर, तालवाद्यावर ओंकार इंगवले, गिटारवर संकेत बारदिया आणि ध्वनीसाठी प्रशांत कांबळे यांनी या कलाकारांना साथ दिली.

सुरेश भट यांची आठवण

या मैफलीत प्रियंका बर्वे आणि राहुल देशपांडे यांनी गझलकार सुरेश भट यांच्या ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मी मज हरपून बसले गं’ या गझला सादर केल्या. त्या ऐकून डॉ. विजय दर्डा यांनी सुरेश भट यांची आठवण काढली.

एस. आकाश यांचे सुरेल बासरीवादन

‘लोकमत सूर ज्योत्स्ना’ आणि बाराव्या ‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळ्यात प्रख्यात बासरीवादक एस. आकाश यांनी आपल्या सुरेल बासरीवादनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.लोकमत सूर ज्योत्स्ना’ सोहळ्याच्या प्रारंभी सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ आकाश यांनी बासरीतून राग यमन सादर करत सभागृहात भारावलेले वातावरण निर्माण केले. यमन रागातील आलाप, विलंबित आणि द्रुत लयीत केलेल्या सादरीकरणामुळे संगीतप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या सादरीकरणात तबल्यावर त्यांना रोहित देव यांनी साथ दिली. बासरी आणि तबल्याचा सुरेल संगम रसिकांना वेगळाच आनंद देऊन गेला. या देखण्या सादरीकरणामुळे ‘सूर ज्योत्स्ना’ सोहळ्याला अधिक रंगत प्राप्त झाली.

Web Title : राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे ने संगीत से कोल्हापुर को मंत्रमुग्ध किया।

Web Summary : राहुल देशपांडे और प्रियंका बर्वे के 'सूर ज्योत्स्ना' में संगीत प्रदर्शन ने कोल्हापुर को मोहित किया। संगीत कार्यक्रम में शास्त्रीय, लोक और फिल्म संगीत का मिश्रण था, जिसने दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया। एस. आकाश की बांसुरी ने कार्यक्रम में जादू भर दिया।

Web Title : Rahul Deshpande, Priyanka Barve enchant Kolhapur with musical evening.

Web Summary : Rahul Deshpande and Priyanka Barve's musical performance at 'Sur Jyotsna' captivated Kolhapur. The concert showcased a blend of classical, folk, and film music, leaving the audience mesmerized. S. Akash's flute performance added to the event's charm.