आर. सी. गँगच्या रवी शिंदेच्या मुसक्या आवळल्या, मोका कारवाईपासून तीन महिने होता पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 18:44 IST2022-02-06T18:44:17+5:302022-02-06T18:44:38+5:30
यापूर्वीच या गॅंगमधील आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे

आर. सी. गँगच्या रवी शिंदेच्या मुसक्या आवळल्या, मोका कारवाईपासून तीन महिने होता पसार
कोल्हापूर : मोका कारवाईनंतर गेले तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा जवाहरनगरातील आर. सी. गँगचा प्रमुख रवी सुरेश शिंदे (वय ३६ रा.साळोखे पार्क) याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुसक्या आवळल्या. काल, शनिवारी रात्री उशिरा वाठार फाटा (ता. हातकणंगले) येथील एका धाब्यावर त्याला सापळा रचून अटक केली. मोका कारवाई झाल्यापासून तो पसार होता.
कोल्हापूर शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, अपहरणासारखे गंभीर स्वरूपाचे ३७ गुन्हे व अदखलपत्र असे एकूण ४५ गुन्हे या आर. सी. गॅंगवर दाखल होते. या संपूर्ण गॅंगवर मोका कारवाई करण्यात आली होती.
कारवाई झालेल्या या गॅंगमधील प्रदीप रामचंद्र कदम, संदीप मोतीराम गायकवाड, जावेद इब्राहिम सैयद, सागर सुरेश जाधव, प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय उर्फ आकाश अशोक कदम, अजय सुनील माने, योगेश मानसिंग पाटील (सर्व रा. जवाहरनगर, कोल्हापूर) या आठजणांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी रात्री वाठार फाटा येथील एका धाब्यावर पसार असलेला रवी शिंदे हा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वषेण पोलीस पथकाचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्याकडील पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. या गँगमधील विकी माटुंगे हा अद्याप पसार आहे, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.