Kolhapur: आधीचे १०० कोटी वारले, म्हणून आता ४०० कोटी जन्माला आले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:16 IST2025-11-11T19:14:53+5:302025-11-11T19:16:05+5:30
निधीतून रस्ते होणार की ठेकेदार, लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आलिशान गाड्या येणार हे कळेलच

Kolhapur: आधीचे १०० कोटी वारले, म्हणून आता ४०० कोटी जन्माला आले का?
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी पालकमंत्र्यांनी ४०० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले. मात्र, पूर्वीचे शंभर कोटी रुपये वारल्यामुळेच हे नव्याने ४०० काेटी आणणार आहात का, असा सवालच सोशल मीडियावरून उपस्थित केला जात आहे.
पूर्वीच्या १०० कोटी रुपयांमधून किती रस्ते झाले, हा संशोधनाचा विषय असताना आता नव्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून रस्ते होणार की ठेकेदार, लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आलिशान गाड्या येणार हे कळेलच, या शब्दांत नेटकऱ्यांनी निधी, रस्ते अन् दर्जा यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी काही वर्षांपूर्वी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतील एकाही रस्त्याचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. ज्या रस्त्याची कामे सुरू आहेत त्यांचा दर्जा पाणंद रस्त्यागत केला आहे. यावरून आंदोलने, मोर्चामुळे कोल्हापूर शहर राज्यभर गाजत आहे.
असे असताना आता पुन्हा नव्याने ४०० कोटी मिळावेत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे नवे ४०० कोटी आले की बैठक होईल, टक्केवारी ठरेल अन् त्यातूनच जो निधी उरेल त्या निधीतून पाणंद रस्ते कोल्हापूर शहरात तयार केले जातील, या शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कोल्हापूरकरांनी मेडिक्लेम पॉलिसी करून घ्या, कारण चांगले अन् दर्जेदार रस्ते हे कोल्हापूरकरांसाठी दिवास्वप्न असेल, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटत आहेत.
कागदं रंगवण्याचे काम सुरू असेल
पालकमंत्र्यांनी निधीच्या प्रस्तावाची घोषणा करताच लोकप्रतिनिधीपासून, इंजिनिअर, ठेकेदार, लिपिक व शिपायानेही आकडेमोड सुरू केली असेल. त्यामुळे येणारा निधी आधीच वाटून झाला आहे, आता केवळ कागदं कशी रंगवायची, यावरच काम सुरू असेल या शब्दांत नेटकऱ्यांनी रस्त्याच्या कामातील गैरव्यवहाराची पाळेमुळेच मांडली आहेत.