आष्ट्यातील भूखंडाचा प्रश्न मार्गी लावणार

By Admin | Updated: August 26, 2015 00:29 IST2015-08-26T00:29:48+5:302015-08-26T00:29:48+5:30

चंद्रकांत पाटील : कोल्हापुरात शिष्टमंडळाशी चर्चा; मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन

The question of plot of land will be in progress | आष्ट्यातील भूखंडाचा प्रश्न मार्गी लावणार

आष्ट्यातील भूखंडाचा प्रश्न मार्गी लावणार

आष्टा : आष्टा शहरातील दत्त वसाहत, गांधीनगर, साईनगर या गट क्रमांक ४, ६, ९ मधील सुमारे सातशे भूखंडधारकांचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.आष्टा (ता. वाळवा) येथील शिवसेनेचे माजी तालुका उपप्रमुख वीर कुदळे, डॉ. सतीश बापट, डॉ. दत्ताजीराव माने, भाजपचेभालचंद्र कुलकर्णी, मारुती माने, शहानवाज मुजावर यांनी कोल्हापूर येथे मंत्री पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, गट क्रमांक ४, ६, ९ मधील खरेदी-विक्री व्यवहार प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद असून या शेतजमिनी १९३0 मध्ये सरकारने काढलेल्या लिलावात बाळासाहेब आप्पासाहेब काळे (पांडुरंग कृष्णा माने), सुभेदार हारुनखान कादरखान व भीमराव बाळासाहेब पाटील यांनी विकत घेतल्या होत्या. या प्लॉटधारकांची नावे सात-बारा सदरी नोंद आहेत. मात्र प्रांताधिकारी इस्लामपूर यांनी सात वर्षांपूर्वी शर्तभंग करुन प्लॉट खरेदी, विक्री झाल्यामुळे गट क्रमांक ४, ६, ९ मधील सर्व खातेदारांना खरेदी-विक्री व्यवहारास बंदी घातली आहे.
सात-बारा उताऱ्यावर भूधारणा पध्दती क्रमांक २ नुसार नोंदी घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र शासन नियमानुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकदा बिगरशेती आदेश झाल्यानंतर तीन वर्षांनंतर रिव्हिजनला घेता येत नाही. जमिनीचे ७00 उपविभाग सर्टिफाय नोंदणी झालेले आहे. याप्रमाणे कायदा हायकोर्ट, सुप्रिम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अशा जमिनीबाबत कोणतीही दंडात्मक कारवाई करता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी शिष्टमंडळास दिले. (वार्ताहर)

]जयंतरावांनी न सोडविलेला प्रश्न चंद्रकांतदादा सोडवतील?
माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी मंत्री असताना अनेक बैठक घेऊनही येथील भूखंडाचा प्रश्न सुटला नाही. म्हणून येथील नागरिकांनी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भूखंडाच्या प्रश्नाबद्दल बाजू मांडली आहे. चंद्रकांतदादा यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, जयंत पाटील यांनी न सोडविलेला प्रश्न चंद्रकांतदादा सोडवतील का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Web Title: The question of plot of land will be in progress