Kolhapur Politics: विरोधात कितीही ताकद लावा.. लढणारच; समरजित घाटगे यांचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:04 IST2024-08-22T16:01:32+5:302024-08-22T16:04:05+5:30

समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

Put any force against it will fight Determination of Samarjit Ghatge  | Kolhapur Politics: विरोधात कितीही ताकद लावा.. लढणारच; समरजित घाटगे यांचा निर्धार 

Kolhapur Politics: विरोधात कितीही ताकद लावा.. लढणारच; समरजित घाटगे यांचा निर्धार 

कोल्हापूर : जगातील सगळी ताकद त्यांच्या पाठीशी असली तरी हा समरजित घाटगे त्यांच्याविरोधात उभा राहणारच, असा निर्धार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी बुधवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याची कागलसह जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेमका महायुतीचा आज, गुरुवारी कोल्हापुरात मेळावा असतानाच घाटगे यांचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

विरोधक मला एकटे पाडत नसून कागलच्या विकासाला ते एकटे पाडत आहेत. ते कागलच्या भविष्याला एकटे पाडत आहेत. पण, ही निवडणूक कुणाला पराभूत करण्याची नाही तर कागलच्या विकासासाठी परिवर्तन घडवण्यासाठी आहे, त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला साथ द्या, अशी भावनिक साद घाटगे यांनी घातली. घाटगे यांनी या व्हिडीओच्या सुरुवातीलाच दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. 

लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत मंडलिक यांनी मला अन्य कुणाची मते नाही पडली तरी चालतील, परंतु मला माझे एकतरी मत पडेल की नाही अशी भूमिका घेतली होती, त्या भूमिकेप्रमाणेच मी उभा राहणार, त्यानुसार तुम्ही सर्वांनी ही निवडणूक हातात घ्यायची आहे. समरजित घाटगे यांना ते एकटे पाडत नाहीत. ते कागलच्या विकासाला, भविष्याला एकटे पाडत आहेत. रोज माझ्यावर टीका करत आहेत; पण ही निवडणूक कुणाला पराभूत करण्यासाठी नाहीच.. आपण जेव्हा जिंकतो, तेव्हा कोणतरी पराभूत होतच असते. त्यामुळे ही निवडणूक कागलच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढवायची आहे. 

सगळ्या युवकांना, महिलांना आवाहन करतो, की आपल्या भविष्याचा विचार करा.. जगातील सगळी ताकद त्यांच्या पाठीशी असली तरी हा समरजित घाटगे त्यांच्याविरोधात उभा राहणारच आणि परिवर्तन घडवणारच.. मी एकच सांगतो, हे परिवर्तन घडवण्यासाठी कोणतीही भूमिका घ्यायला लागो, ती मी घेणार आहे. कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.. काहीही पावले उचलायला तयार आहे, पण ही निवडणूक मी तुमच्यासाठी लढणारच आहे.. मला आपल्या लोकांनी साथ, आशीर्वाद द्या..

Web Title: Put any force against it will fight Determination of Samarjit Ghatge