Maharashtra Vidhan Sabha 2019 : प्रचार कार्यालये हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:55 AM2019-10-11T11:55:39+5:302019-10-11T11:59:49+5:30

दसरा संपल्यानंतर जाहीर प्रचारासाठी अवघे नऊ दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची प्रचार कार्यालये गुरुवारी मतदारांची जोडणी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी अक्षरश: बहरली.

Publicity Offices Houseful, Workers' Meeting, List For Listings | Maharashtra Vidhan Sabha 2019 : प्रचार कार्यालये हाऊसफुल्ल

उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपाचे उमेदवार व विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठेतील प्रचार कार्यालयात गुरुवारी दुपारी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल; यासाठी खलबते सुरू असल्याचे चित्र होते.

Next
ठळक मुद्देप्रचार कार्यालये हाऊसफुल्ल मतदार कुटुंबाला गाठण्यासाठी अधिक धडपड

कोल्हापूर : दसरा संपल्यानंतर जाहीर प्रचारासाठी अवघे नऊ दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची प्रचार कार्यालये गुरुवारी मतदारांची जोडणी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी अक्षरश: बहरली.

मतदारनिहाय यादी करून वैयक्तिक गाठीभेटी घेणे, प्रत्येक वॉर्डनिहाय कोपरा प्रचारसभांचे नियोजन करणे, केंद्रनिहाय याद्या करणे, अशा विविध कामांची लगबग कोल्हापूर उत्तरचे विद्यमान आमदार व शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठ येथील प्रचार कार्यालयात गुरुवारी दिसून आली. या कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी आमदारांचे सुपुत्र ऋतुराज जातीनिशी येथे बसून असल्याचे चित्र होते.

दिवसभरातील सभांचे नियोजन, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, प्रचार साहित्याचे वाटप, नागाव, चुये, पाचगाव, उचगाव, आदी परिसरांत कोपरा सभांचे नियोजन, अशा एक ना अनेक कामांचे वाटप सुरू असल्याचे चित्र दक्षिण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या जिल्हा कार्यालयात दिसले. या कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये लगबग दिसून आली.

संगणकावर मतदारनिहाय यादी करणे, मतदारांची यादी करून त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेणे, प्रचारसाहित्य तळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणे; गावनिहाय याद्या करून योग्य त्या समन्वयक कार्यकर्त्यांकडे पोहोचल्या की नाहीत याची फोनद्वारे शहानिशा करणे; यासह कार्यकर्ते योग्य त्या मतदारांपर्यंत कसे पोहोचतील यासाठी जोडणी लावणे, आदी लगबग दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या रुईकर कॉलनी येथील कार्यालयात सुरू असल्याचे चित्र होते.

पेठापेठांत फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या खेळाडूंना गाठणे, प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली की नाही, याची शहनिशा करणे, विविध पेठांतील कोणत्या मतदाराला गाठल्यानंतर आपल्याला मतदान होईल, आदींबाबत खलबते सुरू असल्याचे चित्र उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या शिवाजी स्टेडियम परिसरातील कार्यालयात गुरुवारी दिसून आले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्यालयच जाधव यांचे प्रमुख प्रचार कार्यालय झाल्याचे चित्र येथे होते.

शहरातील बहुतांश मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वैयक्तिक गाठीभेटी घेण्याचे नियोजन, प्रचारसाहित्य वाटप, अधिकाधिक मतदारांपर्यंत कसे जाता येईल, अशा एक ना अनेक चर्चेची खलबते सुरू असल्याचे चित्र उत्तर विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार सतीशचंद्र कांबळे यांच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील कार्यालयात गुरुवारी होते.
 

 

 

Web Title: Publicity Offices Houseful, Workers' Meeting, List For Listings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.