कोल्हापुरात संरक्षित ‘स्पाईन टेल डेव्हिल रे’ मासा जप्त; वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल
By संदीप आडनाईक | Updated: February 25, 2026 15:02 IST2026-02-25T15:01:59+5:302026-02-25T15:02:17+5:30
Kolhapur Crime News: कोल्हापूर शहरात फुलेवाडी रिंग रोडवर बुधवारी संरक्षित व अत्यंत धोक्यात असलेला ‘स्पाईन टेल डेव्हिल रे’ (शास्त्रीय नाव मोबुला मोब्युलर) हा दुर्मिळ समुद्री मासा विक्रीसाठी आणल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार करवीर (कोल्हापूर) परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी तत्काळ छापा टाकून संबंधित मासा जप्त केला.

कोल्हापुरात संरक्षित ‘स्पाईन टेल डेव्हिल रे’ मासा जप्त; वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल
- संदीप आडनाईक
कोल्हापूर : शहरात फुलेवाडी रिंग रोडवर बुधवारी संरक्षित व अत्यंत धोक्यात असलेला ‘स्पाईन टेल डेव्हिल रे’ (शास्त्रीय नाव मोबुला मोब्युलर) हा दुर्मिळ समुद्री मासा विक्रीसाठी आणल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार करवीर (कोल्हापूर) परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी तत्काळ छापा टाकून संबंधित मासा जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मासा एका मासे विक्री करणाऱ्या कंपनीने बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवला होता. या माशाला पाकड किंवा वागळ असे स्थानिक नावाने ओळखले जाते. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून हा मासा हस्तगत केला. हा मासा १३० किलो वजनाचा असून तो १३० रुपये किलो दराने विकण्यात येणार होता. यासंदर्भात माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वन विभागाने छापा टाकला. बुधवारी दुपारी एक वाजल्यानंतर हा मासा विकला जाणार होता. त्यापूर्वी तो लोकांना पाहायला ठेवला होता. वन विभागाने संबंधित व्यक्तीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संरक्षित वन्यजीवांची खरेदी-विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तत्काळ वनविभागाला कळवावी.या कारवाईमुळे बेकायदेशीर वन्यजीव व्यापारावर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नामशेष होत चाललेली प्रजात
जागतिक स्तरावर विस्तृत प्रसार असला तरी या प्रजातीची संख्या विखुरलेली आहे. ही नामशेष होत चाललेली प्रजात असून काही भागांत, विशेषतः उत्तर-पश्चिम भूमध्य समुद्रात हवाई सर्वेक्षणानुसार सुमारे १२,७०० इतकी संख्या शिल्लक असल्याने आययुसीनच्या यादीत समाविष्ट आहे.