तावडे हॉटेल ते केर्ली उड्डाणपूल, बास्केट ब्रीज, कागल पुलांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:00 IST2025-06-19T13:59:36+5:302025-06-19T14:00:25+5:30

दाभोळकर कॉर्नर ते परीख पुलाचा समावेश

Proposal for Tawde Hotel to Kerli Flyover, Basket Bridge, Kagal Bridge submitted to the Centre Information from Kolhapur District Collector | तावडे हॉटेल ते केर्ली उड्डाणपूल, बास्केट ब्रीज, कागल पुलांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

तावडे हॉटेल ते केर्ली उड्डाणपूल, बास्केट ब्रीज, कागल पुलांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

कोल्हापूर : जिल्ह्यातील तावडे हॉटेल ते केर्ली उड्डाणपूल, बास्केट ब्रीज, कागल उड्डाणपूल या सर्व पुलांचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी दिली. लोकप्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे या प्रस्तावांमध्ये दाभोळकर कॉर्नर ते राजारामपुरी पाच बंगला या उड्डाणपुलाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

मागील महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत या पुलांचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय झाला होता. बास्केट ब्रीज वरून कोल्हापूर शहरात थेट प्रवेश मिळणार आहे. या ब्रीजला जोडूनच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. हा उड्डाणपूल इलेव्हेटेड पद्धतीने उभारण्यात येणार आहे. शहरात आल्यावर मार्केट यार्ड-कावळा नाका-मध्यवर्ती बस स्थानक-दसरा चौक मार्गे उड्डाणपुलाला सीपीआर चौकात वळवले जाईल.
 
स्मशानभूमीच्या बाजूने शिवाजी पुलाकडे रत्नागिरी राज्य मार्गाला, तसेच पंचगंगा नदी घाटाच्या बाजूने लक्षतीर्थ वसाहत मार्गे गगनबावडा राज्य मार्गाला हा उड्डाणपूल जोडला जाणार आहे. याच उड्डाणपुलाला मध्यवर्ती बस स्थानकापासून रेल्वे ओव्हर ब्रीज करून पाच बंगला परिसराशी जोडण्यात यावे, अशी सूचना या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी सातारा कागल महामार्गादरम्यान कागल येथे उड्डाणपूल करण्याची सूचना मांडली होती. या सर्व सूचनांचा समावेश करून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरासाठी पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळताच, तसेच निधीची तरतूद होताच महामार्ग व उड्डाण पुलांचे काम सुरू होणार आहे.

दृष्टीक्षेपात तीन पूल

  • तावडे हॉटेल ते शिवाजी पूल : लांबी १० किलोमीटर, रोज ५० हजार वाहनांची ये-जा
  • कागल उड्डाण पूल : सव्वा दाेन किलोमीटर, २४७ मीटर पिलरचा पूल, खर्च अंदाजे ६०० कोटी
  • सांगली फाटा-उचगाव पिलरचा उड्डाणपूल : साडेतीन किलोमीटर, खर्च ९८० कोटी, उड्डाणपूल २४७५ मीटर
  • या तीन पुलांबरोबरच आता तावडे हॉटेल ते शिवाजी पुलावरील उड्डाणपुलाला दाभोळकर कॉर्नर ते परीखपुलापर्यंत जोडण्यात येणार आहे.

Web Title: Proposal for Tawde Hotel to Kerli Flyover, Basket Bridge, Kagal Bridge submitted to the Centre Information from Kolhapur District Collector