Kolhapur: सर्किट बेंच सुरक्षेसाठी न्यायालयाच्या दारात स्वतंत्र पोलिस चौकीचा प्रस्ताव, पोलिस अधीक्षकांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:51 IST2025-08-05T13:50:42+5:302025-08-05T13:51:32+5:30
वाहतूक नियोजन, बंदोबस्तासाठी शुक्रवारपर्यंत बैठक

संग्रहित छाया
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी नवीन पोलिस चौकीचा प्रस्ताव असून, एका पोलिस निरीक्षकासह सुरक्षा आणि वाहतूक नियोजनासाठी ३५ ते ४० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. शुक्रवारपर्यंत बैठक घेऊन याचे नियोजन केले जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.
सर्किट बेंचचे कामकाज सीपीआरसमोरील न्यायालयाच्या इमारतीत १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी त्या परिसरातील सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाची तयारी पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच पोलिस अधीक्षक स्वत: न्यायालय इमारत आणि परिसराची पाहणी करणार आहेत. जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून आलेल्या सूचनांवर चर्चा होईल. त्यानंतर होणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठकीत सुरक्षा आणि वाहतूक नियोजन केले जाईल.
सुरक्षेसाठी न्यायालयाच्या प्रवेशद्वारातच पोलिस चौकी सुरू केली जाणार आहे. न्यायमूर्तींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था असेल. वकील आणि पक्षकारांसाठी वेगळे प्रवेशद्वार असेल. त्या ठिकाणी मेटल डिटेक्टरसह सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत. सर्किट बेंच पोलिस चौकीसाठी ३५ ते ४० पोलिसांची नियुक्ती होईल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
वाहतूक नियोजनाचे आव्हान
सीपीआर चौकात एकत्र येणारे चारही रस्ते शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यातील भाऊसिंगजी रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यासाठी पर्यायांची पडताळणी सुरू असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. उद्घाटन समारंभासाठीही वाहतूक नियोजन, पार्किंग आणि सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.