ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील १२८ गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार, गावांची तालुकानिहाय संख्या...जाणून घ्या
By भीमगोंड देसाई | Updated: January 14, 2026 13:43 IST2026-01-14T13:43:00+5:302026-01-14T13:43:23+5:30
एक महिना प्रक्रिया चालणार

ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील १२८ गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार, गावांची तालुकानिहाय संख्या...जाणून घ्या
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील १२८ गावांतील प्रॉपर्टी कार्ड ड्रोनद्वारे केले जात आहे. यासाठी दि. ६ जानेवारीपासून ड्रोन उडवून गावठाण हद्दीतील प्रत्येक घराचे, हवाई सर्वेक्षण केले जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात गावात भूमिअभिलेखचे अधिकारी येऊन मालमत्तांची माहिती घेणार आहेत. त्यानंतर १२८ गावांतील प्रत्येक मालमत्ताधारकास प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.
जिल्ह्यात यापूर्वी २१ गावांत ड्रोन फ्लाय होऊनही काही तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या. या गावांसह नव्याने गावठाण, पुनर्वसित अशा १२८ गावांत ड्रोनद्वारे प्रॉपर्टी कार्ड तयार केले जात आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे मोजणी जलद होत आहे. यामुळे भूमिअभिलेखांचे डिजिटायझेशन, पारदर्शकता आणि विकासात्मक कामांसाठी अचूक डेटा उपलब्ध होत आहे. गावठाणातील मिळकतींची अचूक मोजणी करून प्रत्येक मालमत्तेचा नकाशा, हक्क अभिलेख तयार केला जात आहे. प्रॉपर्टी कार्ड तयार होत असल्याने घरकुल कर्ज मिळवणे सुलभ होणार आहे.
प्रत्येक मालमत्ताधारकास नोटीस देऊन स्थळपाहणी
ड्रोन फ्लाय झाल्यानंतर १२८ गावातील सर्व मिळकतधारकांना नोटीस देऊन भूमिअभिलेखचे अधिकारी प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करतात. यावेळी मालमत्ताधारकांनी आपल्या मिळकतीच्या चारही बाजूच्या हद्दी, ग्रामपंचायतकडील घरटान पत्रक, खरेदी खत अशी पूरक कागदपत्रे, वहिवाट दाखवणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया काटेकोरपणे झाल्यास क्षेत्र,नकाशा, प्रॉपर्टी कार्डात त्रृटी राहणार नाहीत, असेही म्हणणे भूमिअभिलेख प्रशासनाचे आहे.
ड्रोन फ्लाय होत असलेल्या गावांची तालुकानिहाय संख्या अशी....
- भुदरगड : २२
- हातकणंगले : १५
- आजरा : १४
- शाहूवाडी :१३
- करवीर : १२
- कागल : १२
- पन्हाळा : ९
- शिरोळ : ८
- चंदगड : ४
- गगनबावडा : ३
- चंदगड : २
- गडहिंग्लज : २
- राधानगरी : १
ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील १२८ गावांतील प्रॉपर्टी कार्ड तयार केले जात आहे. यामुळे मिळकतीच्या मोजणीत अचूकता येणार आहे. कमी कालावधीत प्रॉपर्टी कार्ड तयार करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील पुनर्वसित गावठाणसह सर्व निवासी क्षेत्रातील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. - शिवाजीराव भोसले, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, कोल्हापूर