Kolhapur: प्रशांत कोरटकरला अंडा सेलमध्ये ठेवले, कारागृहातही पोलिसांची करडी नजर
By सचिन यादव | Updated: April 3, 2025 12:45 IST2025-04-03T12:43:57+5:302025-04-03T12:45:09+5:30
दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहारा

Kolhapur: प्रशांत कोरटकरला अंडा सेलमध्ये ठेवले, कारागृहातही पोलिसांची करडी नजर
सचिन यादव
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या प्रशांत मुरलीधर कोरटकरवर कारागृह प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. दिवसरात्र सहाहून अधिक कर्मचारी त्याच्यावर नजर ठेवून आहेत. दहा सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून त्याच्या प्रत्येक हालचालीवर देखरेख ठेवली जात आहे. दिवसभराच्या दिनक्रमात तो इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांचे वाचन करीत असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याबद्दल कोरटकरला अटक केली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनुसार, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानुसार त्याची रवानगी कळंबा कारागृहात केली आहे. गेले चार दिवस तो कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे.
कारागृहात दोन विशेष अंडा सेल आहेत. त्यामध्ये एका भागात मुंबई, सोलापूर येथील सहा गँगस्टरला ठेवले आहे. तर दुसऱ्या भागात प्रशांत कोरटकरला ठेवले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कळंबा कारागृह अलर्ट झाले असून, त्याच्यावर विशेष नजर ठेवली जात आहे. अंडा सेलमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तर या सेलकडे जाण्याच्या मार्गावर सहा सीसीटीव्ही आहेत. रात्रंदिवस अंडा सेलमध्ये कारागृह पोलिसांचा राउंड आहे. त्यातून कोरटकरच्या सर्व हालचालींवर नजर ठेवली जात आहे.
कारागृहाचा दिनक्रम सकाळी सहा वाजता सुरू होतो. सकाळी राष्ट्रगीत झाल्यानंतर कैद्यांना चहा, दूध आणि नाष्टा दिला जातो. त्यानंतर कैद्यांना काम दिले जाते. नऊ वाजता त्यांच्या आवडीनुसार वाचनासाठी वेळ दिला जातो. दुपारी बारा ते तीन विश्रांती आणि त्यानंतर पुन्हा नियोजित वेळापत्रकानुसार कामकाज चालते. अंडा सेलच्या कैद्यांसाठी हाच दिनक्रम असतो. कोरटकर सकाळच्या सत्रात मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांचे वाचन करत आहे. त्याने मागणी केल्यास वाचनासाठी पुस्तके देण्याची तयारी कारागृह प्रशासनाने दर्शविली आहे.
भेटण्याची इच्छा दर्शविली नाही
गेल्या चार दिवसांत कोरटकरने कोणालाही भेटण्याची इच्छा दर्शविलेली नाही. तूर्त तरी त्याच्या भेटीसाठी कोणी आलेले नसल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.
अंडा सेलमधील कैद्यावर विशेष नजर ठेवली जाते. सहाहून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. त्यात कोरटकरवरही विशेष लक्ष आहे. -नागनाथ सावंत, वरिष्ठ कारागृह अधीक्षक, कळंबा