कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट त्याच्या पत्नीने शनिवारी (दि. २२) नागपुरात कोल्हापूरपोलिसांकडे जमा केला. यामुळे तो देशाबाहेर पळाला नसल्याचे स्पष्ट झाले. दोन वर्षांपूर्वीचे त्याच्या कौटुंबिक सहलीचे दुबईमधील फोटो व्हायरल झाल्याने तो देशाबाहेर पळाल्याच्या चर्चा सुरू होत्या. याला अखेर पूर्णविराम मिळाला. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केल्याने जुना राजवाडा पोलिस त्याच्या शोधात आहेत. अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये सुरू होती. दुबईतील त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. फिर्यादी सावंत यांनी जुना राजवाडा पोलिसांची भेट घेऊन कोरटकरचा पासपोर्ट जमा करून घेण्यासाठी त्याच्या पत्नीला नोटीस पाठवण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर कोरटकर कुठेही गेला तरी पोलिस त्याला पकडतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, त्याच्या पत्नीने तपासासाठी नागपुरात असलेल्या कोल्हापूर पोलिसांकडे कोरटकर याचा पासपोर्ट देऊन अफवा आणि चर्चांना पूर्णविराम दिला.
पंचनामा करून पासपोर्ट जप्ततपासासाठी नागपूरला गेलेल्या पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी कोरटकरच्या पत्नीकडून पासपोर्ट घेऊन तो जप्त केला. याचा पंचनामा करून पत्नीचा जबाब नोंदवण्यात आला. पासपोर्ट जप्तीनंतर पथक तपासासाठी पुन्हा चंद्रपूरला रवाना झाल्याची माहिती उपनिरीक्षक गळवे यांनी दिली.
सावंत यांचे निवेदनअटक टाळण्यासाठी कोरटकर दुबईला पळाल्याच्या बातम्या प्रसारित होताच फिर्यादी सावंत यांनी जुना राजवाडा ठाण्यात धाव घेऊन निरीक्षक संजीव झाडे यांना निवेदन दिले. कोरटकर परदेशात पळाला असल्यास त्याला मदत करणा-यांचा शोध घ्यावा. अन्यथा पासपोर्ट जमा करण्याची नोटीस त्याच्या पत्नीला पाठवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.