"प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याकडे लपून होता"; भाजपचा गंभीर आरोप, म्हणाले, "त्याला वाचवण्यासाठी…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:50 IST2025-03-25T11:21:07+5:302025-03-25T11:50:36+5:30
प्रशांत कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात असल्याचे भाजप आमदार परिणय फुके यांनी म्हटलं.

"प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याकडे लपून होता"; भाजपचा गंभीर आरोप, म्हणाले, "त्याला वाचवण्यासाठी…"
Prashant Koratkar Arrest: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला महिन्याभराने अटक करण्यात आली. प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून कोरटकर फरार होता. कोरटकरच्या अटकेवरुन आता राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच प्रशांत कोरटकर तेलंगणा मधील काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होता आणि त्याला वाचवण्याचे काम काँग्रेसनेच केलं आहे असा आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. तेलंगणा काँग्रेस नेत्याच्या घरातून कोरटकरला अटक करण्यात आल्याचे परिणय फुके म्हणाले.
छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून कोरटकर फरार होता. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला तेलंगणाच्या मनचरियालमधून अटक केली. त्यानंतर कोरटकरला सकाळी कोल्हापुरात आणण्यात आलं. मात्र प्रशांत कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात असल्याचे भाजप आमदार परिणय फुके यांनी म्हटलं. फुकेंच्या आरोपावर काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे.
महिनाभर गुंगारा देणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर जाळ्यात कसा अडकला?
"तेलंगणामध्ये प्रशांत कोरटकर एका काँग्रेसच्या नेत्याकडे लपून होता. त्यामुळे कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत होती हे स्पष्ट झालेलं आहे. पण कोरटकरवर कठोर कारवाई होणार आहे," असं परिणय फुके यांनी म्हटलं.
प्रशांत कोरटकरची प्रत्येक गोष्ट भाजपला माहिती - काँग्रेस
"ताबडतोब त्या काँग्रेस नेत्याला अटक करा. वेळ घालवू नका. परिणय फुके हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये राहिलेले नाही. त्यासाठी त्यांनी हे विधान केलेलं आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की यांना प्रशांत कोरटकरची प्रत्येक गोष्ट माहिती होती. प्रशांत कोरटकर भाजपचे नेत्यांच्या किती जवळ आहे हे आता सिद्ध झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही हा संदेश यातून द्या आणि अटक करा, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.
"कोरटकरला लपवणाऱ्या त्या काँग्रेस नेत्याचे सर्टिफिकेट घेऊन यावे. आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे," असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.