इचलकरंजीतील युवा ग्रुप गणेशोत्सव मंडळाचा स्त्युत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST2021-09-23T04:27:01+5:302021-09-23T04:27:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात जुलै महिन्यात येऊन गेलेल्या महापुरामुळे अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. काहींची घरे पडली, ...

Praise of Youth Group Ganeshotsav Mandal in Ichalkaranji | इचलकरंजीतील युवा ग्रुप गणेशोत्सव मंडळाचा स्त्युत्य उपक्रम

इचलकरंजीतील युवा ग्रुप गणेशोत्सव मंडळाचा स्त्युत्य उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात जुलै महिन्यात येऊन गेलेल्या महापुरामुळे अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. काहींची घरे पडली, तर काहींच्या शेतातील उभी पिके वाहून गेली. तसेच अनेक जनावरेही दगावली. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना महापुराच्या संकटातून बाहेर येणे जिकिरीचे झाले. याची दखल घेत गावभाग परिसरातील युवा ग्रुप या गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करत महापुरात दुभती म्हैस मरण पावलेल्या शेतकरी महिलेस उत्सवाच्या इतर खचार्ला फाटा देत गाय भेट स्वरूपात दिली.

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकसानग्रस्त नागरिकांना मदत जाहीर केली. मात्र, महापूर ओसरून दोन महिने लोटले तरी अद्याप काहीजणांना दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे दुभती जनावरे ही उपजीविकेचे साधन असणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. महापुरात मंगल पांडुरंग तोडकर या शेतकरी महिलेची दुभती म्हैस मरण पावली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. त्यामुळे मदत मिळावी, यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शासनाच्या जाचक अटीमुळे त्या महिलेस नुकसान भरपाई मिळाली नाही. याची माहिती युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बचाटे व मंडळातील सदस्यांनी अडचणीत असलेल्या मंगल तोडकर या शेतकरी महिलेला गणेशोत्सवाच्या इतर खर्चाला फाटा देऊन दुभती गाय देण्याचा एकमताने निर्णय घेतला. त्यामुळे युवा ग्रुपने एका शेतकरी कुटुंबाला आधार देण्याचा संकल्प साध्य केल्याचे समाधान व्यक्त होत होते.

यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सुनील महाजन, नगरसेवक सागर चाळके, राजेंद्र बचाटे, विजय जाधव, दादासाहेब मगदूम, डॉ. विजय माळी, डॉ. संदीप बरगे यांच्यासह भागातील महिला, मंडळाचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

फोटो ओळी

२२०९२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीतील युवा ग्रुपच्या वतीने पूरग्रस्त महिलेस गाय भेट देताना वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बचाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Praise of Youth Group Ganeshotsav Mandal in Ichalkaranji