खड्ड्यांचा वाढदिवस, प्रतीकात्मक अंत्ययात्रा; कोल्हापुरात आगळ्या वेगळ्या आंदोलनातून महापालिकेचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:32 IST2025-10-14T15:32:08+5:302025-10-14T15:32:30+5:30
शहरातील अनेक ठिकाणी खड्ड्यांची परिस्थिती गंभीर

खड्ड्यांचा वाढदिवस, प्रतीकात्मक अंत्ययात्रा; कोल्हापुरात आगळ्या वेगळ्या आंदोलनातून महापालिकेचा निषेध
कोल्हापूर : शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात सोमवारी (दि. १३) शाहू सेनेने ‘हॅपी बर्थडे खड्डे’ म्हणत, केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. ‘कोल्हापूरची नवी ओळख खड्डेपूर!’ अशी घोषणा देत आगळ्या-वेगळ्या आंदोलनातून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
शहरातील अनेक ठिकाणी खड्ड्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्रासाचे प्रमाण वाढले आहे. आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. मागील तीन वर्षांत शाहू सेनेने १०० जीवघेण्या खड्ड्यांचे छायाचित्र प्रदर्शन, खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आणि निदर्शनांमधून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
वाचा: गेले आंदोलनाचे वारे... आता नाहीत एन.डी., गोविंद पानसरे
जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी म्हणाले, ‘प्रशासकराज असलेल्या महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. कोट्यवधींच्या निधीचा चुराडा होतो, अधिकारी स्वतःची पाठ थोपटतात; पण कोल्हापूरकरांच्या पाठीचे हाल कोणालाच दिसत नाहीत. वाहनांचे नुकसान, धुळीचे आजार आणि शहराची बदनामी यासाठी प्रशासनच जबाबदार आहे.’
या आंदोलनात उपाध्यक्षा चंदा बेलेकर, चंद्रकांत कांडेकरी, फिरोज शेख, राहुल चौधरी, दाऊद शेख, ऋतुराज पाटील, करण कवठेकर, किरण कांबळे, साहिल पडवळे, अथर्व पाटील, अभिषेक परकाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उपनगर कृती समितीच्या वतीने महापालिका प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
उपनगरातील खड्डेमय रस्ते, कचरा उठाव, भटकी कुत्री याबाबत प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. या दुर्लक्षाबद्दल प्रशासनाचा निषेध करण्यासाठी नवीन वाशीनाका परिसरात उपनगर कृती समितीच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाची सोमवारी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
फुलेवाडी रिंग रोड येथील एका लहान मुलाचा गटारीत बुडून झालेला मृत्यू, फुलेवाडी येथील अग्निशमन दलाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळून एका गरीब व्यक्तीचा झालेला मृत्यू यातून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचा गलथान कारभार दिसून आला आहे. या दोन्ही घटनेत गरीब लहान मूल, निष्पाप मजूर यांना हकनाक प्राण गमवावे लागले आहेत.
काही अधिकाऱ्यांच्या मुजोर पणामुळे, ठेकेदारांना पाठीशी घालण्याच्या प्रवृत्तीमुळे हे मृत्यू घडून आले आहेत. या घटनेस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी तसेच दोषी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अमोल माने यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळेच जागे व्हावे अन्यथा त्यांना पळता भुई थोडी करू, असा इशारा दिला.
या आंदोलनात माजी नगरसेवक माने यांच्यासह सुहास आजगेकर, जयदीप सरवदे, विनोद जाधव, सनी वनारसे, प्रदीप उर्फ बंटी पाटील, दादा माने, विकास जाधव, मिरजकर आदी सहभागी झाले.