गडहिंग्लज साखर कारखाना चालवायला देण्यास स्थगिती?, आज निर्णय होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 11:53 IST2022-06-17T11:52:23+5:302022-06-17T11:53:37+5:30
सभेत झालेल्या प्रचंड गदारोळातच कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्यास आवाजी मताने मंजुरी घेण्यात आली.

गडहिंग्लज साखर कारखाना चालवायला देण्यास स्थगिती?, आज निर्णय होण्याची शक्यता
राम मगदूम
गडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना चालवायला देण्यास उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.११जूनला झालेल्या विशेष सभेच्या ठरावाची प्रत हजर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. आज, शुक्रवारी (१७) यासंदर्भात पुढील आदेश होण्याची शक्यता आहे.
आर्थिक अडचणीमुळे साखर कारखाना व अर्कशाळा सहयोग/बीओटी/ भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय प्रशासक मंडळाने घेतला आहे.त्यासाठी आठवड्यापूर्वी विशेष सभा घेण्यात आली. सभेत झालेल्या प्रचंड गदारोळातच कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्यास आवाजी मताने मंजुरी घेण्यात आली.
परंतु, त्याला विरोध असणाऱ्या सभासदांचे मत विचारात न घेतल्यामुळे संतप्त सभासदांनी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अरुण काकडे यांना काही काळ घेराव घातला होता.दरम्यान, बाळगोंडा नाईक यांच्यासह चार सभासदांनी यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली होती.कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे निवडणुकीनंतरच कारखाना चालवायला देण्याचा निर्णय घेतला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
गुरुवारी(१६) न्यायमूर्ती माधव जामदार व आर.डी.धनुका यांच्यासमोर सुनावणी झाली.अॅड.शैलेंद्र कानेटकर यांनी सभासदांची तर सरकारी वकील पी.जी.सावंत यांनी प्रशासकांची बाजू मांडली.
न्यायालयाचा आदेश असा
- कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना प्रशासकांना असा धोरणात्मक निर्णय घेता येवू शकत नाही.
- शुक्रवारी (१७)विशेष सभेतील ठरावाची प्रत न्यायालयात हजर करावी.
- पुढील आदेशापर्यंत विशेष सभेतील ठरावाची अंमलबजावणी/ कार्यवाही करु नये.