महाराणी ताराराणींवर टपाल तिकीट, मंत्री आशिष शेलार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:36 IST2025-01-14T12:35:45+5:302025-01-14T12:36:37+5:30

चित्ररथाचे उद्घाटन, जिल्ह्यात आठ दिवस फिरणार

Postage stamp on maharani tararani, information from Minister Ashish Shelar | महाराणी ताराराणींवर टपाल तिकीट, मंत्री आशिष शेलार यांची माहिती

महाराणी ताराराणींवर टपाल तिकीट, मंत्री आशिष शेलार यांची माहिती

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या साडेतीनशेव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्यावरील टपाल तिकीट, कॉफी टेबल बुकचे लवकरच प्रकाशन करण्यात येणार असून, नाटकही रंगमंचावर येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. महाराणी ताराराणी यांच्यावरील चित्ररथाचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी नर्सरी बागेत करण्यात आले. त्यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्री शेलार बोलत होते.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने हा चित्ररथ तयार करण्यात आला असून, तो आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात फिरणार आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, मी, मंत्री आशिष शेलार यांनी ताराराणींचा इतिहास नव्या पिढीसमोर येण्यासाठी चित्ररथ आणि अन्य आवश्यक बाबी करण्याचा निर्णय घेतला.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या ताराराणी यांचा इतिहास जनतेसमोर जाण्यासाठी हा चित्ररथ राज्यभर फिरवावा. डॉ. जयसिंगराव पवार लिखित ताराराणी यांचे चरित्रही राज्यभर गेले पाहिजे. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्या सहकार्याने ताराराणी यांनी औरंगजेबाला या मातीतच धूळ चारली.

खासदार शाहू छत्रपती म्हणाले, तो काळ अतिशय खडतर होता. केवळ ताब्यात चार, पाच किल्ले होते; परंतु ज्या पद्धतीने छत्रपती ताराराणी यांनी धैर्य दाखवले आणि दिल्लीच्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडला. यापासून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे.

ऐतिहासिक वातावरण

या चित्ररथामुळे शाहू महाराज स्मृतीस्थळ परिसरात ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले होते. ढाेल-ताशांचा गजर सुरू होता. शाहिराचा खडा आवाज वातावरणात भारदस्तपणा आणत होता. शाहू महाराजांचे समाधीस्थळ आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमामुळे नर्सरी बागेत एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Postage stamp on maharani tararani, information from Minister Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.