कोल्हापुरातील शाहू मिल पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार, पालकमंत्र्यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:31 IST2026-03-04T18:30:43+5:302026-03-04T18:31:00+5:30
जागा हस्तांतराबाबत उद्या मंत्रालयात बैठक, शाहू छत्रपती यांच्याशी चर्चा

कोल्हापुरातील शाहू मिल पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार, पालकमंत्र्यांचे आश्वासन
कोल्हापूर : छत्रपती शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी या लोकभावनेचा आदर करून या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल. प्राथमिक टप्प्यात जागेच्या हस्तांतरणाबाबत उद्या, गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल त्यावेळी सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्व सूचनांचा विचार करून शाहू मिलच्या जागेचा निर्णय घेऊ, असे आश्वासन मंगळवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
न्यू पॅलेस येथे खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत झालेल्या कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शाहू मिलच्या जागेवर पुन्हा सूतगिरणीच सुरू करा, अशी मागणी सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीने केली आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शाहू छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांनी जनतेच्या हाताला काम हा उद्देश ठेवून मिलची उभारणी केली होती. ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आपला सकारात्मक प्रस्ताव शासनाला पाठवावा, अशी मागणी केली.
शाहू मिलमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबत व जागेच्या हस्तांतरणाबाबत उद्या, गुरुवारी वस्त्रोद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी अडीच वाजता मंत्रालयात वस्त्रोद्याेग मंत्री संजय सावकारे यांच्या दालनात बैठक होणार आहे. यावेळी पालकमंत्री, आमदार, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त, वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित असणार आहेत, असे राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केले.
या विषयावर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री आबिटकर यांनी न्यू पॅलेस येथे खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेतली. शाहू छत्रपती यांनी ‘जागा हस्तांतरणाच्या बैठकीत सर्वांच्या सूचनांचा विचार करून तसेच कोल्हापूरकरांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही व्हावी, असे मत मांडले. यावेळी रवी मोरे, दिलीप देसाई, बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, रुपाली कवाळे, माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, महेश उत्तुरे, काकासाहेब पाटील, निवृत्त कामगार काकासाहेब पाटील यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.