पडळ - माजगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:34+5:302021-01-13T05:00:34+5:30
शब्बीर मुल्ला : लाेकमत न्यूज नेटवर्क यवलूज : पडळ फाटा - माजगाव (ता. पन्हाळा) या ...

पडळ - माजगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था
शब्बीर मुल्ला :
लाेकमत न्यूज नेटवर्क
यवलूज : पडळ फाटा - माजगाव (ता. पन्हाळा) या मुख्य मार्गावरील साईडपट्ट्यांचे दुखणे वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या साईडपट्ट्या खचल्याने या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरूच आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.
पडळ , माजगाव व देवठाणे मार्गावरून दररोज शेकडो वाहने धावत असतात. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनला आहे. मुळातच कमी रुंदी व दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या पूर्णपणे खचल्याने अवजड वाहनांना लहान-मोठ्या वाहनांना साईड देताना कसरत करावी लागते. सध्या या मार्गावरून ऊस गळीत हंगामासाठी कुंभी साखर कारखाना, दत्त दालमिया, डॉ. डी. वाय. पाटील, राजाराम साखर कारखाना, श्रीकृष्ण अॅग्री यासह गुऱ्हाळघरांची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या साईडपट्ट्यांची वरवर मलमपट्टी केली होती. परंतु, गतवर्षीच्या पहिल्याच पावसात दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या पूर्णपणे खचल्यानंतर त्यांची नव्याने दुरुस्ती झाली नाही. साईडपट्ट्यांच्या कामाचे रोलिंग पारदर्शी झाले नसल्याने त्यावरील मातीमिश्रीत मुरूम वाहून गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजू पूर्णपणे खचल्या आहेत. त्यामुळे सातत्याने या मार्गावर लहान-मोठ्या अपघातांची श्रुखंला सुरूच आहे.
चौकट - गळीत हंगाम सुरू झाल्यावर या मार्गावर पडळ फाट्यापासून माजगाव फाट्यापर्यंत ऊसाची वाहतूक सुरू असते. मुळातच हा रस्ता अत्यंत अरूंद आहे, शिवाय त्याच्या दोन्ही साईडपट्ट्या खचल्याने या मार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरूच असते. - पा. वि. पाटील माजगाव, संस्थापक अध्यक्ष पी. एन. पाटील दूध संस्था.
फ़ोटो ओळ:- पडळ - माजगाव मुख्य रस्त्याच्या साईडपट्ट्या जागोजागी खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे.
१० पडळ माजगाव रोड